लॉटरीचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:19+5:302021-06-01T04:14:19+5:30
परभणी शहरातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार धोंडिराज बंडाळे यांना ३० जानेवारी रोजी ७६०४०६९७८१ या मोबाईल ...

लॉटरीचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक
परभणी शहरातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार धोंडिराज बंडाळे यांना ३० जानेवारी रोजी ७६०४०६९७८१ या मोबाईल क्रमांकावरून सकाळी ११ च्या सुमारास विक्कीकुमार या व्यक्तीचा फोन आला. त्याने बंडाळे यांना एअरटेल कंपनीची १८ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. त्यासाठी आपल्या खात्यावर काही पैसे टाकावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर बंडाळे यांना त्याने वारंवार फोन केला. तसेच ६ मार्च रोजी पंजाब ॲण्ड सिंध बँकेचा खाते नंबर त्यांना पाठवला. त्यानुसार बंडाळे यांनी २ हजार रुपये पाठवले. त्यानंतर सातत्याने त्याने पैशांची मागणी केली. त्याच्या भूलथापांना बळी पडून वेळोवेळी एकूण १ लाख ४७ हजार रुपये पाठवले. विक्कीकुमार हा पैसे देत नसल्याने बंडाळे यांनी ही बाब त्यांच्या मुलाला सांगितली. त्यांच्या मुलाने त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत २८ मे रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विक्कीकुमार या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.