उपचारासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा चालत्या बसमध्ये हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 18:42 IST2019-09-10T18:39:17+5:302019-09-10T18:42:18+5:30
उपचारासाठी गंगाखेड येथे निघाल्या होत्या

उपचारासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेचा चालत्या बसमध्ये हृदयविकाराने मृत्यू
गंगाखेड: चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वृद्ध महिलेचा मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि. १० ) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लोहा-गंगाखेड बसमध्ये घडली. सरस्वतीबाई राजाभाऊ सोनवणे असे मृत महिलेचे नाव असून ही घटना केरवाडी ते मरडसगाव प्रवासादरम्यान घडली.
पालम तालुक्यातील वनबुजवाडी येथील सरस्वतीबाई राजाभाऊ सोनवणे (६५) यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांचा मुलगा व सून यांनी त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखविले. येथे डॉक्टरांनी त्यांना गंगाखेड येथील ह्रदयरोग तज्ञाकडे नेण्याची सुचना केली. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पालम येथुन लोहा-गंगाखेड बसने (क्रमांक एमएच २० बी.एल. ९५१६ ) त्या गंगाखेडकडे निघाल्या. प्रवासादरम्यान केरवाडी ते मरडसगाव जवळ सरस्वतीबाई सोनवणे यांना चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला. याची माहिती वाहक प्रियंका चावरे यांनी चालक पी.एस. रेवले यांना दिली. त्यांनी तातडीने बस गंगाखेड बसस्थानकात आणली.
रावण भालेराव व इतर प्रवाशांच्या मदतीने सरस्वतीबाई सोनवणे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुल, तीन मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे.