अरे व्वा! येलदरीतून पिकांना पाणीही मिळणार अन् विज निर्मीतीही सुरु
By मारोती जुंबडे | Updated: February 21, 2023 19:34 IST2023-02-21T19:34:03+5:302023-02-21T19:34:20+5:30
येलदरीतून सोडले पाणी; ६० हजार हेक्टरवरील उन्हाळी पिकांना फायदा

अरे व्वा! येलदरीतून पिकांना पाणीही मिळणार अन् विज निर्मीतीही सुरु
येलदरी : येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या तीन संचापैकी दोन संचामधून दररोज ४ दलघमी एवढे पाणी २१ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता सोडण्यात आले आहे. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील जवळपास ६० हजार हेक्टर वरील उन्हाळी हंगामातील पिकासाठी पाण्याचा लाभ होणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे.
येलदरी धरणातून उन्हाळी हंगामातील प्रमुख असलेल्या भुईमूग व ऊस या पिकासाठी आता पाण्याचे दुसरे अवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरीतून सिद्धेश्वर धरणात नदी वाटे नेले जाते. सिद्धेश्वर मधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा, लासीना, वसमत व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन करत आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मिळून ५७ हजार ९८८ हेक्टर जमीनीवरील उन्हाळी पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. तसेच या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हुन अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामध्ये परभणी , हिंगोली, पूर्णा, वसमत, जिंतूर या मोठ्या शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामासाठी येलदरीतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे.
चार वर्षापासून धरण तुडूंब
२०१९ पासून येलदरी धरण सातत्याने १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा उपयोग योग्य पध्दतीने करावा, तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा व पाण्याची बचत करावी असे आवाहन जल संपदा विभागाचे नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी केले आहे.