कृषि विभागात शेतकऱ्याची अडवणूक, पर्यवेक्षकाने स्वीकारली ३ हजारांची लाच

By मारोती जुंबडे | Published: March 12, 2024 05:10 PM2024-03-12T17:10:55+5:302024-03-12T17:11:12+5:30

मी तुमचे मोठे काम केल्याचे सांगून स्वीकारली ३ हजारांची लाच

Obstacle of farmer in agriculture department, supervisor accepted bribe of 3 thousand | कृषि विभागात शेतकऱ्याची अडवणूक, पर्यवेक्षकाने स्वीकारली ३ हजारांची लाच

कृषि विभागात शेतकऱ्याची अडवणूक, पर्यवेक्षकाने स्वीकारली ३ हजारांची लाच

परभणी: शासनाच्या योजनेतून खरेदी केलेल्या रोटावेटरची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षकाने तक्रारदाराकडून मी तुमचे मोठे काम केल्याचे सांगून ३ हजारांची लाच स्वीकारल्याचे १२ मार्च रोजी समोर आले. याप्रकरणी एसीबीकडून पर्यवेक्षकासह ताब्यात घेण्यात आले.

तक्रारदाराच्या पुतण्याची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रोटावेटरसाठी ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झाली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांच्याकडून लाभार्थ्यास रोटावेटर खरेदीसाठी पूर्वसंमती पत्र देण्यात आले.  तक्राराच्या पुतण्याने रोटावेटरची खरेदी केली. परंतु, या रोटावेटरची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी पर्यवेक्षकाने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या गावी भेट देऊन खरेदी केलेल्या रोटावेटरचे फोटो काढले.  मी तुमचे मोठे काम केले आहे. यापूर्वी पण तुमच्या भावाला अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्टरचे फोटो काढून वेबसाईटवर अपलोड केले आहेत. तेव्हा तुम्ही मला येऊन भेटा, असे सांगितले. त्यानंतर ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने एसीबी कार्यालयात धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. ५ मार्च रोजी एसीबी कार्यालयाकडून पंचासमक्ष लाचेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १२ मार्च रोजी एसीबी कार्यालयाकडून सापळा रचण्यात आला. यामध्ये पर्यवेक्षक मोहन देशमुख यांनी पंचासमक्ष ३ हजारांची लाच स्व:ता स्वीकारली. त्यानंतर तातडीने एसीबी पथकाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

शासकीय योजनेतही लूट सुरूच
केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, दुसरीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून यातही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचे वारंवार समोर आले. त्यातच शासकीय योजनेतील लाभाच्या वस्तूंचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी काही जणांकडून लाचेची मागणी केली जात आहे. त्यातच एसीबी कार्यालयाकडून मंगळवारी केलेल्या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

Web Title: Obstacle of farmer in agriculture department, supervisor accepted bribe of 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.