अनधिकृत नळजोडण्यांची संख्या १५ हजारांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:29+5:302021-02-08T04:15:29+5:30

परभणी : शहरासाठी नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, जुन्या पाणीपुरवठा योजनेवरील सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक नळ जोडण्या अधिकृत ...

The number of unauthorized pipe connections is more than 15,000 | अनधिकृत नळजोडण्यांची संख्या १५ हजारांपेक्षा अधिक

अनधिकृत नळजोडण्यांची संख्या १५ हजारांपेक्षा अधिक

परभणी : शहरासाठी नवी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असून, जुन्या पाणीपुरवठा योजनेवरील सुमारे १५ हजारांपेक्षा अधिक नळ जोडण्या अधिकृत करण्याचे आवाहन मनपासमोर आहे.

शहराचा पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली असली तरी प्रत्यक्षात या योजनेवर नळ जोडण्या वाढल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचे वितरण करताना मनपा प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शहरामध्ये ८० हजार मालमत्ता आहेत. या मालमत्तांपैकी किमान निम्म्या मालमत्ताधारकांनी अधिकृत नळ जोडणी घेतल्यासच पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य होणार आहे. मनपा प्रशासनाने मध्यंतरी नवीन नळ जोडण्यांसाठी पथकांची स्थापना केली होती. मात्र, त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होऊनही शहरातील पाण्याची समस्या कायम आहे. अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्या अधिकृत करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. सध्यातरी लोकसंख्येच्या तुलनेत शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शहरवासीयांना मात्र आठ ते १० दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नव्या योजनेनंतरही शहरातील पाण्याचा प्रश्न कायम आहे.

शहरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शन काढणे, जलवाहिनीला लागलेली गळती दूर करणे ही कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. शहरात तीन प्रभाग समित्या असून, याअंतर्गत अनधिकृत नळ जोडणी शोधण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या पथकांकडून अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे शहरात नेमक्या अनधिकृत जोडण्या किती आहेत? याची एकत्रित माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाला नियोजन करणे गरजेचे झाले आहे. सुरुवातीला अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेणे, त्यानंतर या जोडण्या अधिकृत करून घेणे याशिवाय जुन्या जलवाहिनीवर असलेल्या अनधिकृत नळ जोडण्याही नवीन जलवाहिनीवर करून घेणे या कामांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता मनपा प्रशासनाला ही कामे प्राधान्याने करावी लागणार असून, सध्या तरी नवीन जलवाहिनीवर नळ जोडण्या घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

शहरात १५ हजार अनधिकृत जोडण्या

परभणी शहरात अनधिकृत नळ जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात महापालिकेकडे एकत्रित आकडा उपलब्ध नसला तरी १५ हजार नळ जोडण्या अनधिकृत असाव्यात, अशी शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या नळ जोडण्या शोधून अधिकृत करण्याचे काम मनपा प्रशासनाला करावे लागणार आहे. सध्यातरी अनधिकृत नळ जोडण्यांची शोध मोहीमही थंड आहे.

Web Title: The number of unauthorized pipe connections is more than 15,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.