इच्छुकांची संख्या दररोज वाढू लागली
By Admin | Updated: June 13, 2014 00:32 IST2014-06-13T00:30:06+5:302014-06-13T00:32:09+5:30
प्रसाद आर्वीकर, परभणी लोकसभेची निवडणूक ओसरली अन् विधानसभेचे वेध लागले असून, दररोज इच्छुकांच्या यादीत नव्या नव्या नावांची भर पडत आहे.

इच्छुकांची संख्या दररोज वाढू लागली
प्रसाद आर्वीकर, परभणी
लोकसभेची निवडणूक ओसरली अन् विधानसभेचे वेध लागले असून, दररोज इच्छुकांच्या यादीत नव्या नव्या नावांची भर पडत आहे. दिवसेंदिवस ही यादी वाढत असल्याने उमेदवार निवडताना पक्षश्रेष्ठींचीच कसोटी लागेल, असे दिसते.
परभणी विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे. आ. बंडू जाधव यांना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी बढती देऊन लोकसभेची उमेदवारी देऊ केली. या संधीचे सोने करीत आ. जाधव यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्यांनी विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत आमदारकीची खुर्ची रिकामी झाली असून, या जागेवर दावा सांगणारे अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. विधानसभेला महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे तर आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी पहावयास मिळते.
हणुमंत बोबडे यांच्यानंतर माजी खा. तुकाराम रेंगे आणि आ.ब् ांडू जाधव यांच्या दोन अशा पाच टर्म म्हणजे २५ वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या बरीच आहे. आ. बंडू जाधव यांच्यानंतर कोण? याविषयी नागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता आहे. सध्या तरी शिवसेनेच्या गोटातून युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल पाटील, मनपा गटनेते अतुल सरोदे, जिल्हाप्रमुख संदीप भंडारी, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, झरी येथील गजानन देशमुख, बाळासाहेब जाधव यांची नावे इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहेत. खा. बंडू जाधव यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात उमेदवार निवडताना खा. जाधव यांची भूमिका महत्त्वाची असेल. ते सांगतील तोच उमेदवार राहण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसनेही जोरात तयारी केली असून, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेश देशमुख, संजीवनी मित्रमंडळाचे आनंद भरोसे, तुकाराम रेंगे, रविराज देशमुख, कुंडलिक नागरे, भगवानराव वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, रवि पतंगे, विखार लाला, गफ्फार मास्टर, संजय देशमुख यांची नावे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेमध्ये आहेत. आनंद भरोसे यांची वर्षभरापासूनच तयारीही सुरू केली आहे. ग्रामीण भागाशी नाळ असणाऱ्या भरोसे यांचा शहरातही चांगला संपर्क आहे. जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख हे ज्येष्ठ नेते असून अनुभवी आहेत. भगवानराव वाघमारे मनपा गटनेते, जिल्हा बँक, बाजार समिती संचालक म्हणून तर डॉ. विवेक नावंदर यांनी मनपा आणि वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली तर राज्यमंत्री फौजिया खान, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जू लाला, बाळासाहेब जामकर हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असतील. बहुजन समाज पार्टी देखील या मतदारसंघातून उमेदवार देते. त्यामुळे बसपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक जण प्रयत्नात आहेत. याशिवाय अपक्षांमधून इच्छुकांची संख्या अधिक आहे. एकंदर यावेळच्या विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची यादी लांबत आहे.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
शिवसेनाबंडू जाधव ६६०२१
अपक्ष विखार अहेमद खान ४५४९८
काँग्रेसतुकाराम रेंगे ३०७२६
इच्छुकांचे नाव पक्ष
डॉ.राहुल पाटील शिवसेना
सुरेश देशमुख काँग्रेस
आनंद भरोसे काँग्रेस
कुंडलिक नागरे काँग्रेस
प्रा.फौजिया खान राष्ट्रवादी
प्रताप देशमुख राष्ट्रवादी
सज्जू लाला राष्ट्रवादी