आता सरपंच निवडीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:05+5:302021-02-05T06:06:05+5:30
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे. ...

आता सरपंच निवडीकडे लक्ष
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाले असून, आता ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष सरपंच निवडीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले. गावपातळीवर या निवडणुकांना महत्व आहे. अनेक नवीन राजकारणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतूनच राजकारणात प्रवेश करतात. मागील काही वर्षांपासून ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे या निवडणुकीचे महत्व अधिकच वाढले आहे. मागील आठवड्यात ग्रामपंचायतीसाठी निवडणुका पार पडल्या. यावर्षी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाने स्वतंत्र निर्णय घेत निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार २५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले. नवीन आरक्षणानुसार काही ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या इच्छुक उमेदवारांची अडचण झाली तर काही ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद सुटल्याने इच्छुकांना पर्याय निवडावा लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता प्रत्यक्ष सरपंचपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात सरपंचपदासाठी समीकरणे जुळविली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याचीच चर्चा अधिक रंगत आहे. निवडणूक विभागातून सरपंच निवडीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्यक्ष निवड प्रक्रिया घेतली जाते. अद्याप हा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षांचाही सहभाग
ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्या तरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात राहाव्यात, यासाठी राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातात. त्यातूनच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय पक्षांमधून दावे-प्रतिदावे सुरु झाले होते. आपल्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या, यावरून ग्रामीण भागात पक्षांची ताकद ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरपंचपदी कोणाची वर्णी लागते, यावरही ती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात आहे, हे ठरणार असल्याने या निवडीकडे राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आरक्षणामुळे अनेकांची गोची
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांची गोची झाली आहे. काही पॅनलने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले असले तरी त्या पॅनलकडे सरपंचपदाचा उमेदवार नसल्याने नाईलाजाने ग्रामपंचायत विरोधी गटाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सरपंचपदाचा उमेदवारच निवडणुकीतून पराभूत झाल्याने पॅनलप्रमुखांची अडचण झाली आहे. त्यामुळे सध्या गावागावात सरपंचपदासाठी तयारी सुरू झाली असून, या निवडीकडे लक्ष लागले आहे.