परभणीत नवं पर्व! महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुखांनी स्वीकारला पदभार
By राजन मगरुळकर | Updated: February 16, 2026 13:35 IST2026-02-16T13:33:44+5:302026-02-16T13:35:06+5:30
शहराची स्वच्छता सोबतच कर्मचाऱ्याच्या पगाराचा प्रश्न आणि विविध नागरी समस्या आगामी काळात सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार : महापौर

परभणीत नवं पर्व! महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुखांनी स्वीकारला पदभार
परभणी : परभणीच्या महापौरपदी गुरुवारी निवड झालेले उद्धव सेनेचे नगरसेवक सय्यद इकबाल आणि उपमहापौर काँग्रेसचे नगरसेवक गणेश देशमुख यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार महापालिकेतील महापौर, उपमहापौर कक्षात स्वीकारला. शहराची स्वच्छता सोबतच कर्मचाऱ्याच्या पगाराचा प्रश्न आणि विविध नागरी समस्या आगामी काळात सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे महापौर सय्यद इकबाल यांच्यासह उपमहापौर गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह नगर सचिव विकास रत्नपारखे आणि सर्व विभागप्रमुख, कर्मचारी यांच्यावतीने नूतन महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक, गटनेते यांचे स्वागत करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत हा पदभार कक्षामध्ये स्वीकारला.
यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, सय्यद कादर, गटनेते दिलीपसिंह ठाकुर, गटनेते गुलमीर खान, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, माजू लाला, नदीम इनामदार, अतुल सरोदे, व्यंकट डहाळे यांच्यासह उद्धव सेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य इमारत परिसरात महापौर, उपमहापौर यांचे स्वागत करण्यात आले. दोघांनीही त्यांच्या कक्षामध्ये पदवार स्वीकारला आणि शहर विकासाच्या संदर्भात आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली.