किनवट येथील मामाच्या घरी जाताना हरवलेला मुलगा सापडला नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 15:54 IST2018-04-06T15:54:15+5:302018-04-06T15:54:15+5:30
दोन दिवसांपूर्वी किनवट (जि. नांदेड) येथून हरवलेला ७ वर्षाचा मुलगा नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नांदेड ते पूर्णा दरम्यान सापडला आहे.

किनवट येथील मामाच्या घरी जाताना हरवलेला मुलगा सापडला नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये
पूर्णा : दोन दिवसांपूर्वी किनवट (जि. नांदेड) येथून हरवलेला ७ वर्षाचा मुलगा नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये नांदेड ते पूर्णा दरम्यान सापडला आहे. पोलीस व प्रवाशांनी सतर्कता दाखवित हरवलेल्या मुलास बुधवारी पालकांच्या स्वाधीन केले.
४ एप्रिल रोजी काही प्रवाशांना नागपूरहून मुंबईकडे जाणा-या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये ७ वर्षाचा मुलगा सापडला. प्रवाशांनी या मुलास पूर्णा येथील रेल्वे पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचा-यांकडे सुपूर्द केले. जमादार सागर पेठे, पो.शि. राठोड यांनी सापडलेल्या मुलाला विश्वासात घेऊन माहिती विचारली. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या मुलाने आपण किनवट येथील असून गणेश अंकूश राठोड असे नाव असल्याचे सांगितले. त्यावरुन नांदेड रेल्वे पोलिसांना ही माहिती देण्यात आली. नांदेड पोलिसांनी किनवट येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता ४ एप्रिल रोजी सकाळी शिवाजीनगर किनवट येथून या नावाचा मुलगा हरवल्याची नोंद मिळाली. व्हॉटस्अॅपवरून पूर्णा पोलिसांनी सापडलेल्या मुलाचा फोटो किनवट पोलिसांना पाठविला. त्यानंतर सापडलेला मुलगा गणेश राठोड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गणेश राठोड याचे आई-वडील, आजी व मामा यांनी बुधवारी रात्री १२ वाजता पूर्णा गाठले. पोलिसांनी शहानिशा करून मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
मामाच्या घरी जाण्यासाठी निघाला होता मुलगा
बुधवारी सकाळी गणेश राठोड हा किनवट येथे जवळच राहत असलेल्या मामाच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. परंतु, बराच वेळ तो परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी गणेश राठोड याचा शोध घेतला. परंतु, मुलगा सापडत नसल्याने अंकुश राठोड यांनी पोलीस ठाण्यामध्ये मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. प्रवासी व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगा सापडला असून े पोलिसांच्या रुपात देवच भेटल्याचे नातेवाईकांनी सांगितले.