पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर परभणीतील नानलपेठ ठाणे सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 18:41 IST2020-05-25T18:39:27+5:302020-05-25T18:41:25+5:30
कर्मचारी राहत असलेला पोलीस मुख्यालयाचा परिसर देखील सील करण्यात आला आहे

पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर परभणीतील नानलपेठ ठाणे सील
परभणी : येथील नानलपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा कर्मचारी राहत असलेला पोलीस मुख्यालयाचा परिसर आणि नानलपेठ पोलीस ठाणेही सील केले आहे़ कोरोनामुळे पोलीस ठाणे बंद करण्याची वेळ जिल्ह्यात प्रथमच ओढावली आहे़.
येथील नानलपेठ पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे़ रविवारी रात्री जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बाधित कर्मचारी राहत असलेल्या पोलीस वसाहतीतील बिल्डिंग क्रमांक १९ मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या़ बिल्डिंग क्रमांक १९ प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे़ महानगरपालिका आणि पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी बिल्ंिडग सील करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार ही बिल्डिंग सील करण्यात आली़ त्याचबरोबर हा कर्मचारी काम करीत असलेल्या नानलपेठ पोलीस ठाणे ही सील करण्यात आले आहे़