The name disappeared from Satbara; Farmer dying in effort of correction in Pathari | सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू 
सातबाऱ्यावरून नाव गायब झाले; दुरुस्तीसाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयात मृत्यू 

पाथरी (परभणी ) : तुरा येथील एका शेतकऱ्याने पीकविमासाठी सातबारा काढल्यानंतर त्याचे नाव गायब झाल्याचे निदर्शनास आले. सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी तहसीलदार आणि तलाठ्याकडे हेलपाटे मारून थकलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२३ ) दुपारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. 

मुंजाभाऊ दादाराव चाळक ( 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंजाभाऊ दादाराव चाळक आणि राजेभाऊ दादाराव चाळक या दोघा भावांची तुरा येथे गट नंबर १३१ मध्ये प्रत्येकी ७१ आर जमीन आहे. पिकविमा भरण्यासाठी या जमिनीचा मुंजाभाऊ यांनी सातबारा काढला. यावेळी त्यांचे नाव त्यावर आढळून आले नाही. नाव समाविष्ट करण्यासाठी त्यांनी तलाठ्याकडे चकरा मारल्या. त्याने दाद न दिल्याने तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्याकडेही आज दुपारी तक्रार केली. मात्र,  त्यांनी पुन्हा तलाठ्याकडे जाण्यास सांगितल्याने. 

यामुळे मुंजाभाऊ परत शिक्षक कॉलनीतील तलाठी कार्यालयात गेले. नाव गायब झाल्याच्या धक्क्याने आणि कार्यालयांचे हेलपाटे खाल्याने थकलेल्या मुंजाभाऊ यांना अस्वस्थ वाटू लागले. यातच हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी तलाठी आणि तहसिलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी बंधू राजेभाऊ चाळक आणि इतर शेतकरी यांनी पोलीस ठाण्यात केली. मुंजाभाऊ यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल करा यासाठी नातेवाईक यांनी प्रेत तहसीलदार यांच्या कार्यालयात नेण्यासाठी गाडीत टाकले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.


Web Title: The name disappeared from Satbara; Farmer dying in effort of correction in Pathari
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.