टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत
By राजन मगरुळकर | Updated: July 22, 2025 13:06 IST2025-07-22T13:06:40+5:302025-07-22T13:06:40+5:30
या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केले अटक

टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाचा खून; फरार संस्थाचालक पती-पत्नी १२ दिवसांनी अटकेत
परभणी : पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत मुलीची टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालक जगन्नाथ हेंडगे यांचा संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थाचालक पती आणि पत्नी या दोघांना परभणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. तब्बल बारा दिवसांनी प्रकरणातील दोघेही आरोपी ताब्यात घेतल्याने पोलिसांनाही यश आले आहे.
फरार संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण अशी ताब्यात घेतलेल्या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेमध्ये सदरील घटना १० जुलै रोजी सायंकाळी घडली होती. यानंतर पूर्णा पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील हे तपास करीत होते. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, चालक सिद्धेश्वर शिवणकर, विलास सातपुते, शरद सावंत यांनी केली. तांत्रिक विश्लेषणासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, उपनिरीक्षक चंदन सिंह परिहार, वाघमारे, गणेश कोटकर, बालाजी रेड्डी, जयश्री आव्हाड यांनी केली. नमूद दोन्ही आरोपींना पूर्णा येथील न्यायालयात हजर केले जाणार होते.
काय आहे प्रकरण:
जगन्नाथ हेंडगे यांनी त्यांची मुलगी पल्लवी हिचा प्रवेश तिसरीच्या वर्गामध्ये बाळकृष्ण सेवाभावी संस्था वाडी, तुळजापूर संचलित हायटेक रेसिडेन्शियल स्कूल झिरो फाटा येथे जून महिन्यात घेतला होता. मुलगी पल्लवी ही निवासी शाळेत एक आठवडा राहून सहा जुलै रोजी उखळद येथे परत आली. त्यानंतर शाळेत जायचे नाही, मला तेथे राहायचे नाही, असे म्हणून ती घरीच थांबली. यानंतर १० जुलै रोजी इतरत्र प्रवेश घेण्यासाठी तिचा या शाळेतील दाखला काढून आणण्यासाठी जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हायटेक रेसिडेन्शिअल स्कूलवर गेले होते. त्यावेळी जगन्नाथ हेंडगे हे शाळेच्या मुख्य कार्यालयात गेले तर सोबतचे नातेवाईक मुख्य प्रवेशद्वारावर थांबले होते. यानंतर १५ ते २० मिनिटांनी आरडाओरड करत घाबरलेल्या अवस्थेत जगन्नाथ हेंडगे तेथून बाहेर पडले. यावेळी नातेवाईकांनी काय झाले असे विचारले असता त्यांनी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले व उर्वरित रक्कम द्या, असे म्हणून पुन्हा मारहाण केली. घटनेनंतर नमूद दोघे हे तेथून निघून जा नाहीतर तुमच्यावर केस करतो, असे म्हणून कारमध्ये बसून निघून गेले. जगन्नाथ हेंडगे यांना जबर मार लागल्याने ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांना परिसरातील काही नागरिक व नातेवाईकांनी परभणीत एका दवाखान्यात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.