पीपीई किटवगळता अंत्यसंस्काराचे पालकत्व स्वीकारले महापालिकेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST2021-04-21T04:17:44+5:302021-04-21T04:17:44+5:30

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने २६ हजार आणि मृतांच्या आकड्याने ७००चा टप्पा गाठला आहे. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात होणारे मृत्यू ...

Municipal Corporation accepts guardianship of funeral without PPE kit | पीपीई किटवगळता अंत्यसंस्काराचे पालकत्व स्वीकारले महापालिकेने

पीपीई किटवगळता अंत्यसंस्काराचे पालकत्व स्वीकारले महापालिकेने

शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येने २६ हजार आणि मृतांच्या आकड्याने ७००चा टप्पा गाठला आहे. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात होणारे मृत्यू दररोज मोठ्या प्रमाणावर आहेत. शहरात होणाऱ्या मृतांवर परभणीत महापालिकेचे पथक अंत्यसंस्कार करत आहे. शहरात तीन स्मशानभूमी आहेत. यामध्ये जिंतूर रोडवरील अमरधाम, खानापूर फाटा आणि खंडोबा बाजार येथील स्मशामभूमीचा समावेश आहे. दिवसागणिक १५ ते २० मृत्यू शहरात होत आहेत.

यातील सर्वाधिक अंत्यसंस्कार जिंतूर रोड अमरधाम येथे होतात. त्यानंतर गरज पडल्यास उर्वरित दोन ठिकाणांचा वापर केला जातो.

महापालिका करते सर्व खर्च

शववाहिनी, लाकडाचा खर्च, राळ, मीठ, कपडा यासह अन्य बाबींचा खर्च महापालिका करते.

एकाच शववाहिनीवर भार

महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी जिल्हा रुग्णालयाची एक शववाहिका ताब्यात घेतली आहे. त्याद्वारे दिवसभरात झालेले मृत्यू अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले जातात. बहुतांश वेळी एका चकरेत दोन ते तीन मृतांचे देह यातून नेले जातात. यामुळे काही वेळा उर्वरित मृतांच्या अंत्यसंस्काराला वेळ लागतो. परिणामी, मयताच्या नातेवाइकांना त्रास सहन करावा लागतो.

एकाच वेळी १५ जणांचे अंत्यसंस्कार

जिंतूर रस्त्यावरील अमरधाम येथे एकूण सहा ओटे सर्वसाधारण मयत झालेल्यांच्या अंत्यसंस्कारास राखीव आहेत, तर अन्य १५ अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा कोरोनामुळे मृत झालेल्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे जागेची उपलब्धता अजून तरी मोठ्या प्रमाणावर आहे.

आठ जणांचे पथक

महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यासह मुकादम किरण गायकवाड, पथक सदस्य शेख सलीम, भीमराव उबाळे, गौतम उबाळे, अशोक उबाळे, राहुल भराडे, नामदेव उबाळे व शववाहिनी चालकाचा समावेश आहे.

असे लागते साहित्य

चार क्विंटल लाकूड, ३ ते ४ लिटर डिझेल, मीठ, राळ, १० ते ३० फूट कपडा, खड्डा करण्यासाठीची यंत्रणा.

पीपीई किटचा खर्च मयताच्या नातेवाइकांचा

खासगी रुग्णालयात मयत झालेल्याचा खर्च दवाखाना प्रशासन मयत रुग्णाच्या एकूण बिलामध्ये समाविष्ट करत आहे. नेमका हा खर्च किती असतो, ते सांगणे अवघड आहे.

- मयत रुग्णाचे नातेवाईक

रीतिरिवाजाप्रमाणे करतो विधी

मयत कोणत्या जाती-धर्माचा आहे, हे पाहून त्याच्या नातेवाइकांना अपेक्षित असलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे विधी करण्याचे काम पथक पार पाडत आहे.

- करण गायकवाड, मुख्य स्वच्छता निरीक्षक

Web Title: Municipal Corporation accepts guardianship of funeral without PPE kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.