महापालिका, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाच मास्कवापराचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:17+5:302021-02-27T04:23:17+5:30
परभणी : मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका व नगरपालिकेकडून एकीकडे दंडात्मक कारवाई केली जात असताना, दुसरीकडे याच कार्यालयातील ...

महापालिका, नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाच मास्कवापराचा पडला विसर
परभणी : मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर महानगरपालिका व नगरपालिकेकडून एकीकडे दंडात्मक कारवाई केली जात असताना, दुसरीकडे याच कार्यालयातील कर्मचारी मास्कचा वापर करीत नसल्याची बाब शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आली आहे.
परभणी महानगरपालिकेस शुक्रवारी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास भेट दिली असता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच असलेल्या आवक-जावक स्वीकारण्याच्या कक्षात चार कर्मचारी बसून होते. त्यांतील दोन कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर केला नव्हता. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब बुलबुले हे यावेळी महापालिकेतील कामाच्या अनुषंगाने या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत होते; परंतु, हे कर्मचारी मात्र बिनदिक्कतपणे मास्क न लावताच त्यांच्याशी बोलत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. स्वच्छता अभियान कक्ष व अन्य विभागांतही असेच चित्र होते.
जिल्हा परिषदेतही मास्कवापराला खो...
कोरोनाच्या अनुषंगाने ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे जिल्हा परिषदेचे काम असताना या विभागाच्या कार्यालयातही अनेक कर्मचारी मास्कवापराला खो देत असल्याची बाब शुक्रवारी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या आवारातही काही नागरिकांकडून मास्क वापरला जात नव्हता. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनाच स्वत: नियम पाळण्याचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याचे शुक्रवारी पाहावयास मिळाले.
५० टक्के कर्मचारी विनामास्क
परभणी महानगरपालिकेतील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मास्क लावला नसल्याचे दिसून आले. अशीच काही परिस्थिती सेलू नगरपालिकेतही दिसून आली. या पालिकेत दुपारी २.४५ च्या सुमारास पाणीपट्टी वसुली विभागातील कर्मचाऱ्यांनीही मास्कचा वापर केला नव्हता.