वारीत गेलेल्या गंगाखेडच्या मृदुंग वादकाचा पंढरपूरजवळ विहिरीत बुडून मृत्यू, घातपाताचा संशय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:26 IST2025-07-04T13:25:50+5:302025-07-04T13:26:15+5:30
कुटुंबीयांना या प्रकरणात घातपाताचा संशय : गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू

वारीत गेलेल्या गंगाखेडच्या मृदुंग वादकाचा पंढरपूरजवळ विहिरीत बुडून मृत्यू, घातपाताचा संशय?
गंगाखेड (जि. परभणी) : तालुक्यातील मसला येथील रहिवासी असलेल्या तरुण मृदुंग वादक गोविंद विनायक शिंदे (वय १५) या वारकऱ्याचा पंढरपूरनजीक एका शेतातील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता घडली. मात्र, कुटुंबीयांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती.
गंगाखेड शहरातील श्री संत सोपान काका महाराज इसादकर यांच्या व दिंडी क्रमांक १६ ठाकूरबुवा यांच्या दिंडीतील वारकरी मृदुंग वादक गोविंद विनायक शिंदे या १५ वर्षीय वारकऱ्याचा पंढरपूरनजीक १४ किलोमीटरवरील बंडी शेगाव परिसरात एका शेतात गुरुवारी सकाळी १० वाजता अंघोळीसाठी विहिरीवर गेल्यानंतर विहिरीत पडून अपघाती मृत्यू घडल्याची घटना घडली. या घटनेने श्री संत सोपान काका महाराज इसादकर व ठाकूर बुवा दिंडीतील वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली. घटनेचे वृत्त कळताच गंगाखेड तालुक्यातील मसला येथील मयत तरुण वारकरी गोविंद विनायक शिंदे यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मयताचे नातेवाईक व गावकऱ्यांना मृत्यूबाबत काही संशयास्पद आढळल्याने त्यांनी थेट पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. मयत वारकरी विनायक यांचा मृत्यू अपघाती नसून, घातपाताचा प्रकार असल्याची शंका त्यांनी पोलिसांना उपस्थित केली. दरम्यान, पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.
खासदार संजय जाधव यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
संपूर्ण घटनेदरम्यान परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात भेट देऊन मृताच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात तरुण वारकऱ्याच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंद करण्याची पोलिस ठाण्यात कारवाई सुरू होती.