ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार

By ज्ञानेश्वर भाले | Published: March 10, 2024 05:50 PM2024-03-10T17:50:32+5:302024-03-10T17:51:15+5:30

आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक, संशोधन कार्यात विद्यापीठास होणार लाभ

MoU of Marathwada Agricultural University with university in Australia | ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाशी मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सामंजस्य करार

ज्ञानेश्वर भाले परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाच्या वेस्टर्न सिडनी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागातून कृषी संशोधन आणि शैक्षणिक कार्यासाठी सामंजस्य करार दिल्लीत करण्यात आला. करारावर कुलगुरू डॉ. इंद्र मणी, वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. देबोराह स्वीने, हॉक्सबरी पर्यावरण व कृषी संस्थेच्या संचालक प्रा. इअन अँडरसन यांनी स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी वेस्टर्न सिडनी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल स्ट्रॅटेजी, पार्टनरशिप विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. निशा राकेश, वरिष्ठ संशोधन कार्यक्रमाधिकारी डॉ. कोपाल चौबे आणि दक्षिण आशियाच्या विभागीय संचालक नम्रता आनंद आदींची उपस्थिती होती.

याबाबत माहिती देताना कुलगुरू इंद्र मणी म्हणाले की, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील अग्रगण्य असून, परभणी कृषी विद्यापीठाच्या संशोधनासह शैक्षणिक उपक्रमास यातून लाभ होणार आहे. दोन्ही विद्यापीठाने संयुक्तपणे संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार असून, याचा कृषी शास्त्रज्ञांना आणि विद्यार्थ्यांना लाभ होईल. यासाठी सामंजस्य कराराच्या माध्यमातून संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक कार्यक्रम राबविणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात परस्पर भेटी, परिषदा, परिसंवादाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण याचा लाभ शैक्षणिक दर्जा उंचावण्यात होणार आहे. यासह जागतिक दर्जाच्या ज्ञानप्रसाराला चालना देण्यासाठी संयुक्त प्रकाशाने करणे, अभ्यासक्रम राबविणे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करणे, उच्च पदवी विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी कार्यक्रम आणि शैक्षणिक प्रकल्पांचा विकास साधने, असे या सामंजस्य करारातून विकासात्मक बाबी साधता येणार आहेत.

Web Title: MoU of Marathwada Agricultural University with university in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.