वीज गळती अधिक तर वसुली कमी; परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:53 IST2022-06-11T16:52:43+5:302022-06-11T16:53:41+5:30
कामगिरी अतीशय सुमार असून बेजाबदार असल्याचे कारण देत केले निलंबित

वीज गळती अधिक तर वसुली कमी; परभणी महावितरणचे अधीक्षक अभियंता निलंबित
परभणी : वीज गळती , रोहित्र बिघडण्याचे वाढते प्रमाण व वसुलीत कमी पडल्याचा ठपका ठेवत परभणी मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता प्रविण दत्तात्रय अन्नछत्रे यांना महावितरण कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्याचे आदेश १० जून रोजी संचालक (संचलन) व सक्षम अधिकारी संजय कृष्णराव ताकसांडे यांनी काढले आहेत.
३० डिसेंबर २०१९ पासून परभणी मंडळ कार्यालयाचा अधीक्षक अभियंता या पदावर प्रविण अन्नछत्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात मंडळांतर्गत २०२१-२२ या कालावधीत वितरण ३०.१६ टक्के, लघुदाब हानी ३१.५७, रोहित्र बिघडण्याचे प्रमाण १४.५३ टक्क्यावर गेले होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी अधीक्षक अभियंता यांच्याकडून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित होण्याचा कालावधी वाढून महावितरणची वीज विक्री कमी झाल्याचे निदर्शनास आले.
आपली कामगिरी अतीशय सुमार असून बेजाबदार असल्याचे कारण देत संचालक (संचलन) व सक्षम अधिकारी संजय कृष्णराव ताककसांडे यांनी १० जून रोजी काढलेल्या आदेशात परभणी मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता प्रविण दत्तात्रय अन्नछत्रे यांना पुढील आदेशापर्यंत कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.