जिल्ह्यात दीड महिन्यांत ६५ जणांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:11 IST2021-03-29T04:11:38+5:302021-03-29T04:11:38+5:30
परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा ...

जिल्ह्यात दीड महिन्यांत ६५ जणांना मृत्यूने गाठले
परभणी : जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढला तसा मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. या काळात ६५ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ३५ जणांचा मृत्यू हा शासकीय रुग्णालयात झाला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आरोग्य विभागाने तपासण्या जवळपास तिपटीने वाढविल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही तेवढीच होत आहे. रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही त्याच तुलनेने वाढले आहे. मागील कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयातील मृत्यूची संख्या कमी होती. परंतु, या टप्प्यात खासगी रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. १५ फेब्रुवारीपासून ते २७ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ३० रुग्णांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला असून, ३५ रुग्णांचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला आहे.
जानेवारी महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. मात्र फेब्रुवारीमध्ये ही संख्या झपाट्याने वाढत गेली. त्याचबरोबर रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयात सर्वसाधारणपणे एक-दोन दिवसांआड एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत होता. परंतु, मागच्या ५ दिवसांपासून मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. मागच्या ५ दिवसांत ३० रुग्णांचा मृत्यू झाला.
उपचारापूर्वी मृत्यूचे प्रमाण नगण्य
कोरेाना रुग्णाला उपचार मिळण्यापूर्वीच किंवा त्यास दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या नोंदी जिल्ह्यात नाहीत. हे प्रमाण तसे शून्य आहे. शासकीय पातळीवर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात उपचारापूर्वी किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची आकडेवारीही प्रशासनाकडे उपलब्ध नाही.
आतापर्यंत ९२ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू
मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून आतापर्यंत साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९२ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत झाल्याची नोंद आहे.
त्याचप्रमाणे ८७ रुग्णांचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांनी, ७७ रुग्णांचा मृत्यू चार ते सात दिवसांनी, ५९ रुग्णांचा मृत्यू ८ ते १४ दिवसांनी तर ४३ रुग्णांचा मृत्यू १४ दिवसांनी झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.