आई-बाबा, स्वत:साठी अन् आमच्यासाठी मास्क वापरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:14+5:302021-02-27T04:23:14+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर जाताना स्वत:साठी आणि आमच्यासाठी मास्क वापरा, असे भावनिक आवाहन विद्यार्थ्याकडून ...

आई-बाबा, स्वत:साठी अन् आमच्यासाठी मास्क वापरा !
परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने घराबाहेर जाताना स्वत:साठी आणि आमच्यासाठी मास्क वापरा, असे भावनिक आवाहन विद्यार्थ्याकडून आई-बाबांना करण्यात येत आहे. मास्कचा वापर हाच कोरोना प्रतिबंधासाठी खरा उपाय आहे, असेही विद्यार्थी साद घालत आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावले आहेत. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, धार्मिकस्थळे आदींवर प्रतिबंध लावले आहेत. शिवाय आंदोलनांनाही तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाचा फैलाव होऊ नये, या उद्देशाने प्रशासन एकीकडे उपाययोजना करीत असताना अनेक नागरिक तमा न बाळगता मास्कचा वापर करीत नसल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनीही ऱस्त्यावरुन उतरुन नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनीही आपल्या आई-वडिलांना घराबाहेर पडताना स्वत:साठी व आमच्यासाठी आणि सर्व कुटुंबियांसाठी मास्कचा वापर असे भावनिक आवाहन केले आहे. मास्कचा वापरच कोरोना प्रतिबंधासाठी परिणामकारक आहे. त्यामुळे हमखास मास्क वापरा, सॅनिटायझरचाही वापर करा, फिजिकल डिस्टन्स ठेवा, गर्दीमध्ये जाणे टाळा, असेही
आवाहन विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांमध्ये नियमितपणे वाढ
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. १फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७ हजार ९५७ होती. गेल्या २६ दिवसांमध्ये त्यात ४५८ रुग्णांची भर पडली आहे. विशेषत: गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामध्ये सोमवारी २२, मंगळवारी २९, बुधवारी ५५, गुरुवारी ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्याला विदर्भाची सीमा लागून असल्याने व विदर्भात कोरोनाचा मोठा संसर्ग वाढल्याने या अनुषंगाने खबरदारी घेणे आवश्यक आहे.
‘‘ कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरुन पुरेपुर उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही त्यांची जबाबदारी ओळखून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असली तरी स्वत:हून नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला पाहिजे. गर्दीत जाणे टाळले पाहिजे. सॅनिटायझर सोबत ठेवला पाहिजे. कोरोनाच्या अनुषंगाने काही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
-डॉ.संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी, परभणी.
‘‘आई-वडील घराबाहेर जाताना मास्कचा वापर टाळला जातो. बऱ्याचवेळा सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. ही बाब चुकीची आहे. या संदर्भात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
-आरती टाक, पाथरी
‘‘आमचे आई-बाबा कोरोनाबाबत सतर्क आहेत. घराबाहेर पडताना ते स्वत: बरोबरच इतरांचीही काळजी घेतात. नियमितपणे मास्कचा वापर करतात. त्यामुळे समाधान वाटते. इतर नागरिकांनीही याच पद्धतीने राहिले पाहिजे.
-अक्षद मोगरे, पाथरी
‘‘कोरोनाच्या बातम्या टीव्हीवर बघताना भीती वाटते. आई-वडिल दोघेही दररोज शाळेत नोकरीवर जातात. त्यामुळे पूर्वी काळजी वाटत होती. आता दोघेही मास्क आणि सॅनिटायझरचा नियमित वापर करतात. आम्हालाही तसे प्रबोधन करतात.
-समर्थ मचाले, सेलू
‘‘आई-वडिल भाजी विक्री करतात. त्यामुळे अधिक लोकांचा त्यांचा संपर्क येतो. घाईघाईत कधी मास्क घरी विसरतात. त्यांना नेऊन मास्क मी स्वत: देतो. आई-वडिलांची काळजी वाटते. सायंकाळी घरी आल्यानंतर हातपाय धुतात.
-व्यंकटेश खंदारे, सेलूृ
‘‘आम्ही शाळेत मास्क वापरतो. मात्र आई-वडिल मास्क वापरत नव्हते. शिक्षकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही आई-वडिलांना कोरोनाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्यानुसार आता आई-वडिल मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत.
-हर्षदा पैजणे, सोनपेठ
‘‘कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आई-वडिलांसह कुटुंबातील सर्वांनाच मास्क वापराबाबत सांगत आहे. त्यामुळे सर्वजण मास्कचा वापर करीत आहे. इतरांनीही याचे अनुकरण करावे.
-साक्षी दळवे, सोनपेठ