‘कस्टमर सपोर्ट’ फाइल उघडताच मोबाईल हॅक; खात्यातून दीड लाख घेतले काढून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:50 IST2025-04-30T14:46:42+5:302025-04-30T14:50:02+5:30
मोबाइल हॅक करून दीड लाखांची फसवणूक; कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल

‘कस्टमर सपोर्ट’ फाइल उघडताच मोबाईल हॅक; खात्यातून दीड लाख घेतले काढून
परभणी : मोबाइलवर पाठवलेल्या बनावट फाईलच्या माध्यमातून मोबाइल हॅक करून १ लाख ६३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना परभणीतील जिंतूर रोड परिसरात घडली. याप्रकरणी २८ एप्रिल रोजी कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरहीन रंगरेज (रा. सिटी फक्शन हॉल, जिंतूर रोड परिसर) यांनी यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २७ एप्रिल रोजी रात्री ८ ते ८:४५ वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून ‘कस्टमर सपोर्ट’ नावाची एक फाईल मोबाइलवर पाठवली. संबंधित व्यक्तीने ती फाईल उघडण्यास सांगितले. फाईल उघडताच त्यांचा मोबाइल हॅक झाला आणि त्यानंतर एकूण १ लाख ६३ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाइन काढून घेण्यात आले. ही फसवणूक लक्षात येताच फरहीन रंगरेज यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.