मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके
By राजन मगरुळकर | Updated: September 10, 2022 15:46 IST2022-09-10T15:43:21+5:302022-09-10T15:46:38+5:30
आरोपीने मंगळवारी परभणीतून पळ काढला. त्यानंतर त्याचे पहिले लोकेशन औरंगाबाद आले

मनसे शहराध्यक्ष खून प्रकरण; आरोपीचा मोबाईल स्वीचऑफ, पुण्यापर्यंत पोहोचली पोलीस पथके
परभणी : मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांच्या खुनाच्या घटनेला पाच दिवस उलटले आहेत. या खुनाच्या घटनेत आरोपीच्या शोधासाठी स्थापन केलेली पथके औरंगाबाद, नगर, पुण्यापर्यंत आरोपीच्या काही मिनिटाच्या मोबाईल लोकेशनवरून पोहोचली. मात्र, त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून आरोपीने फोनच बंद केला आहे. परिणामी, अजूनही पथके तपासासाठी विविध ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत.
मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांचा मंगळवारी पहाटे शिवराम नगर भागात खून झाला. यात सचिन पाटील यांचे भाऊ संदीप पाटील यांनी फिर्याद दिली. नवा मोंढा ठाण्यात दाखल झालेल्या घटनेत आरोपी विजय जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तीन पथके स्थापन केली. ज्यात नवा मोंढ्याचे एक व स्थानिक गुन्हा शाखेचे दोन पथक कार्यरत आहेत.
आरोपीने मंगळवारी परभणीतून पळ काढला. त्यानंतर त्याचे पहिले लोकेशन औरंगाबाद आले, तेथे काही वेळातच पथक पोहोचले असता पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपीचे लोकेशन नगर येथे मिळाले. पथक तेथेही पोहोचले. मात्र, तोपर्यंत आरोपी पुण्यात असल्याचे लोकेशन समजले. त्यावरून हे पथक सर्व ठिकाणी गेले. परंतू, त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. गेल्या चार दिवसांपासून आरोपीचा मोबाईल बंद असल्याचे समजते. पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार हे दररोज या घटनेच्या तपासाची माहिती घेत आहेत. जिल्हा पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
नातेवाईक, कुटुंब, मित्रांची चौकशी
आरोपी विजय जाधव याचे नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्य आणि मित्र या सर्वांची चौकशी करण्यात आली. त्यात आरोपीच्या गावांमध्येही पथक गेले होते तर पुण्यातील नातेवाईक व अन्य सदस्यांचीही चौकशी करून माहिती पथकाने घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.