जिल्ह्यातील बाजारपेठ पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:27+5:302021-04-18T04:16:27+5:30
परभणी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. शनिवारी किराणा, भाजीपाल्याचीही दुकाने बंद राहिल्याने बाजारपेठेत ...

जिल्ह्यातील बाजारपेठ पडली ओस
परभणी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. शनिवारी किराणा, भाजीपाल्याचीही दुकाने बंद राहिल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. विशेष म्हणजे नागरिकांनीही संयमाची भूमिका घेत घराबाहेर पडण्याचेही टाळल्याने रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसून आली.
मागील एक महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनली आहे. दररोज ६०० ते ७०० रुग्ण नव्याने कोरोनाबाधित होत आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदी आणि निर्बंध लागू केले आहेत. आतापर्यंत या निर्बंधांतून किराणा आणि भाजीपाला दुकानदारांना सवलत दिली होती. मात्र, शुक्रवारी नवीन पत्रक काढून १ मेपर्यंत किराणा दुकान व भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला शनिवारी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण जिल्हाभरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. किराणा दुकाने आणि भाजीपालाही नागरिकांना मिळाला नाही. विशेष म्हणजे, नागरिकांनीही शनिवारी संयमाची भूमिका घेत घराबाहेर पडण्याचे टाळले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दिसणारी नागरिकांची गर्दी शनिवारी मात्र ओसरली होती. जिल्हाभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठेही बाजारपेठ सुरू नसल्याने बाजारपेठ भाग ओस पडल्याचे दिसून आले. परभणी शहरातील कच्छी बाजार, शिवाजी चौक, गुजरी बाजार, स्टेशन रोड, नानलपेठ या परिसरात सर्वच्या सर्व दुकाने बंद राहिल्याने शुकशुकाट होता. १ मेपर्यंत ही दुकाने बंद राहणार आहेत.
केवळ औषधी दुकाने, दवाखाने सुरू
शनिवारी जिल्हाभरात सर्व दुकाने बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल थांबली आहे. परभणी शहरात केवळ औषधी दुकाने आणि दवाखाने तेवढे सुरू होते. बाकी इतर व्यवहार मात्र बंद राहिले.
शहरात फिरून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त देविदास पवार, तहसीलदार संजय बिरादार यांनी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची कारणे विचारली. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची काही वाहनेही जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शहरातील शिवाजी चौक, जामनाका, वसमत रोड आणि खानापूर फाटा या भागात फिरून अधिकाऱ्यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे व घरात थांबण्याचे आवाहन केले.