सेलू : तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाजार समितीच्यावतीने शहरातील वालूर रस्त्यावरील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात उभारण्यात आलेल्या १०० बेडचे कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन सहकार व पणन मंञी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन झाले. यावेळी पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली.
मार्च महिन्यापासून शहरासह ग्रामीण भागात मोठ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासकीय कोरोना केअर सेंटर फुल्ल झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बाजार समितीच्यावतीने शहरातील मुलींच्या अल्पसंख्याक वसतिगृहात १०० बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. सोमवारी रितसर या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मिना, माजी आ. विजय भांबळे, उपजिल्हा निबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार बालाजी शेवाळे, जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी, सभापती रामराव उबाळे, मुख्य प्रशासक विनायक पावडे, माउली ताठे, जि.प. सदस्य अशोक काकडे, हेमंतराव आडळकर, पवन आडळकर, अजय डासाळकर, प्रकाश पौळ, निर्मला लिपणे आदींची उपस्थिती होती. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना योग्य उपचार आणि सुविधा या सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच तज्ज्ञ डाॅक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांना उपचार केले जाणार आहेत, तसेच चहा, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण रुग्णांना दिले जाणार असून, प्रत्येक प्राथमिक सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे विनायक पावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटील, मलिक यांच्याकडून कौतुक
राज्यात एकमेव परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत, जिंतूर येथील बाजार समितीने पुढाकार घेऊन कोरोना केअर सेंटर उभारून कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील या बाजार समितीच्या पदाधिकारी यांचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि पालकमंत्री नवाब मलिक यांनी ऑनलाइन उद्घाटन प्रसंगी कौतुक केले.