बाजारपेठ बंद; रस्त्यांवर तुरळक वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST2021-05-31T04:14:23+5:302021-05-31T04:14:23+5:30
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने अजूनही वीकेंड संचारबंदी सुरूच ठेवलेली आहे. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढून जीवनावश्यक ...

बाजारपेठ बंद; रस्त्यांवर तुरळक वाहतूक
कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी जिल्हा प्रशासनाने अजूनही वीकेंड संचारबंदी सुरूच ठेवलेली आहे. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश काढून जीवनावश्यक सेवा असलेल्या किराणा आणि फळे, भाजीपाला विक्रीची दुकाने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले. शनिवारी बाजारपेठ भागात काही प्रमाणात वर्दळ दिसून आली होती. मात्र, रविवारी बाजारपेठ भागातील बहुतांश दुकाने बंद होती. काही भागांत व्यापारी बंद दुकानासमोर थांबून ग्राहकांची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. मात्र, रस्त्यावरच तुरळक वर्दळ असल्याने फारसा परिणाम झाला नाही. शिवाजी चौक, गुजरी बाजार, कच्छी मार्केट, नानलपेठ या परिसरात दुपारनंतर शुकशुकाट पाहावयास मिळाला. बाजारपेठ भागातील शिवाजी चौक, अष्टभुजा देवी मंदिर, वसमत रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर या भागात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात फरक जाणवला.
रविवारी शहरातील बाजारपेठ भागातील रस्त्यांसह, बसस्थानक ते उड्डाणपूल, गंगाखेड रोड, जिंतूर रोड, वसमत रोड या मार्गावरील वाहतूक कमी झाली होती. तुरळक वाहने रस्त्याने धावताना दिसून आली. दुपारनंतर ही संख्याही कमी झाली. त्यामुळे संचारबंदीच्या शेवटच्या दिवशी शहरातील वातावरण सामसूम झाल्याचे पाहावयास मिळाले.
तपासणी केंद्राला नागरिकांची प्रतीक्षा
रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची शिवाजी चौक भागात रॅपिड अँटिजन तपासणी करण्यासाठी मनपाने केंद्र सुरू केले आहे. या तपासण्या करण्यासाठी सकाळपासूनच हे केंद्र सज्ज ठेवण्यात आले. मात्र, रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांची संख्याच कमी झाल्याने या केंद्रावरही शुकशुकाट पाहावयास मिळाला. रॅपिड तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या किट घेऊन दोन महिला कर्मचारी या ठिकाणी दिवसभर थांबून होत्या.