परभणीत पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 14:14 IST2019-03-20T14:13:30+5:302019-03-20T14:14:51+5:30
एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.

परभणीत पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
परभणी : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी २३ जणांनी अर्ज घेतले असले तरी एकाही उमेदवाराने नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली.
१९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहेत. अर्ज दाखल करण्याच्या पहिला दिवशी पक्ष पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. एकूण २३ जणांनी अर्ज घेतले. मात्र एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.
दाखल करण्यास ४ दिवस
१९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून २६ मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. या आठ दिवसांच्या काळात तीन शासकीय सुट्या आल्या आहेत. त्यात २१ मार्च रोजी धूलिवंदनाची सुटी आहे. २३ मार्च रोजी चौथा शनिवार आणि २४ मार्च रोजी रविवारची सुटी असल्याने उद्यापासून उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यास केवळ चार दिवस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांना घाई करावी लागणार आहे.