भाषेच्या माध्यमातून साहित्य समृद्ध होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:40+5:302021-02-05T06:06:40+5:30
परभणी: भाषा विकसित होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. भाषा आणि समाज एक अतूट असं नातं असतं. भाषा शुद्ध अशुद्ध असूच ...

भाषेच्या माध्यमातून साहित्य समृद्ध होते
परभणी: भाषा विकसित होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. भाषा आणि समाज एक अतूट असं नातं असतं. भाषा शुद्ध अशुद्ध असूच शकत नाही पण भाषेतला अस्सलपणा जपला पाहिजे. कारण भाषेच्या माध्यमातून साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन डॉ. आसाराम लोमटे यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणी, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ व बी.रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ जानेवारी रोजी बी. रघुनाथ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका सरोज देशपांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी रेणू पाचपोर, डॉ.आसाराम लोमटे यांची उपस्थिती होती. भाषा आणि समाज या विषयावर बोलताना लोमटे म्हणाले की, ज्या प्रमाण भाषेच्या बोली रसरसशीत आहेत. जिवंत आहेत, ती भाषा जास्त समृद्ध होते. लोकभाषा, लोकजीवन व भिन्न भिन्न भाषेच्या समूहाशी संपर्क कमी होत गेला की आपल्याला शब्द कमी पडू लागतात. भाषा केवळ संवादाचे माध्यम आहे, असे नाही तर ते ज्ञान संपादन, ग्रहण करण्याचेही माध्यम आहे, असेही ते म्हणाले. या वेळी रेणू पाचपोर यांनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या. ‘आता, ती नाही, पण भोवती वावरत असते, येता जाता माळ्यावरची, तिची लोखंडी पेटी दिसते, पेटी उघडून पाहण्याचे धाडस मात्र, मला अजिबात होत नाही, वाटते...उघडल्याबरोबर पेटी, बोलण्याचा ..हसण्याचा .. तिचा अचानक आवाज येईल, तिनं जपून जपून ठेवलेले, तेव्हाचे ते पितळी तुकडे, सोन्याचेच आहेत..., असे उगाच वाटून जाईल!’ ही आई विषयावरील कविता सादर केली.
‘सावल्या’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ अशा अनेक दर्जेदार कविता सादर करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अध्यक्षीय समारोपात सरोज देशपांडे म्हणाल्या, भाषा आणि साहित्य व भाषा समृद्धीसाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा. माणिक पुरी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. भगवान काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कथाकार राजेंद्र गहाळ, सावित्री चिताडे, प्रा. सखाराम कदम, प्रा.हनुमान व्हरगुळे, अरविंद सगर, गंगाधर गायकवाड, बबन आव्हाड यांच्यासह साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.