जीवघेणा पूर, मृत्यूशी झुंज देत होते मजूर; परभणीत प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

By मारोती जुंबडे | Updated: September 13, 2025 12:23 IST2025-09-13T12:21:45+5:302025-09-13T12:23:38+5:30

थूना नदीच्या पाण्यात अडकलेल्या चार मजूरांची थरारक सुटका;परभणीतील रेस्क्यू ऑपरेशनचे सर्वत्र कौतुक

Life-threatening flood, four laborers were fighting death; A major tragedy was averted due to the promptness of the Parbhani administration | जीवघेणा पूर, मृत्यूशी झुंज देत होते मजूर; परभणीत प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

जीवघेणा पूर, मृत्यूशी झुंज देत होते मजूर; परभणीत प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

परभणी: समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वेळी थूना नदीत अचानक पूर आल्यानं तिथल्या पाण्यात मशीनरीसह त्यावर काम करणारे चार मजूर शुक्रवारी सायंकाळी अडकून पडले. ही घटना महसूल प्रशासनाला समजली आणि त्या नंतर पूर्णापरभणी येथील रेस्क्यू पथकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शनिवारी पहाटे सुमारे ६ वाजता चारही मजूर पाण्यापासून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मशीनरी आणि साहित्य ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे थूना नदीत अचानक आलेल्या पूराच्या पाण्यात काही मशीनरी अडकल्या होती, आणि त्याच मशीनरीवर काम करणारे चार मजूरही अडकले होते. ही माहिती महसूल प्रशासनाला शुक्रवारी रात्री उशिरा कळली. त्यानंतर प्रशासनाने शनिवारी पहाटेपासूनच शोधमोहीम सुरू केली. बचाव कार्यासाठी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी नदीच्या प्रवाहाशी झुंज देत मोहिम राबवली. जवळपास तासभर चाललेल्या मोहिमेनंतर पहाटे ६ वाजता विक्की सिंग लक्ष्मण सिंग, सलाउद्दीन सिद्दिकी, शिवकुमार आणि सदाकत अली या चारही मजूरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नदीतील प्रचंड पाण्याचा जोर आणि मशिनरीवर अडकलेले मजूर यामुळे प्रसंग जीवघेणा आणि थरकाप उडवणारा होता. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून या बचाव कार्याबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी नायब तसिलदार प्रशांत थारकर, मंडळाधिकारी सुदाम खूणे, अजय कटके, केशव गंलाडे, शिवप्रसाद देवणे, नामदेव कळसाईतकर यांसह अनेकांनी मोठे प्रयत्न केले.

Web Title: Life-threatening flood, four laborers were fighting death; A major tragedy was averted due to the promptness of the Parbhani administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.