शासकीय रुग्णालयात खाटा कमी; बाळंतपणासाठी महिला जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:00+5:302021-02-27T04:23:00+5:30
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांची संख्या ८० ते ८५ आहे. मात्र या ...

शासकीय रुग्णालयात खाटा कमी; बाळंतपणासाठी महिला जास्त
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात बाळंतपणासाठी येणाऱ्या महिलांची संख्या ८० ते ८५ आहे. मात्र या ठिकाणी केवळ ५० खाटाच उपलब्ध असल्याने महिलांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. परभणीकरांच्या शंभर खाटांच्या मागणीकडे आरोग्य विभागाचे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्ष आहे.
येथील स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यासह परजिल्ह्यातील महिला बाळंतपणासाठी येतात. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा गरोदर मातांना मिळत नाहीत. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयातील शुल्क परवडत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मातांची बाळंतपणासाठी स्त्री रुग्णालयाला पसंती आहे. मात्र या ठिकाणी केवळ ५० खाटाच असल्याने महिलांची गैरसोय होत आहे. कधी कधी तर एका खाटेवर दोन महिलांना उपचार घ्यावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
डॉक्टरांचा वेळेवर राऊंड होतो का?
या स्त्री रुग्णालयात बाळंतपणासाठी आलेल्या मातांची डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. त्यासाठी सकाळ व सायंकाळी दोन वेळा राऊंड होतो.
बाळंतपणासाठी येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीनही कार्यान्वित आहे.
त्याचबरोबर महिन्यातून दोन वेळा स्त्री रोग तज्ज्ञ रुग्णालयाला भेट देऊन महिलांची तपासणी करतात.
नातेवाईकांना मिळेना सुविधा
जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्री रुग्णालयात रुग्णांना बेड, गादी, बेडसीट, पाणी यासह इतर सुविधा मिळत असल्या तरी रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना मात्र कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. स्त्री रुग्णालयासमोर नातेवाईकांना थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांऐवजी मनोरुग्ण व दारू पिलेले इतर नागरिकच या ठिकाणी थांबतात. त्यामुळे नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.