बोरगव्हाण शिवारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2023 19:40 IST2023-05-05T19:39:42+5:302023-05-05T19:40:03+5:30
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवारात भेट देऊन पाहणी केली

बोरगव्हाण शिवारात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
पाथरी - तालुक्यातील बोरगाव शिवारामध्ये आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला. याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी गावाला भेट दिली. यावेळी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. दरम्यान, गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यामध्ये तालुक्यातील रेणाखळी शिवारामध्ये एका बिबट्या शेतात डुकरासाठी लावलेल्या जाळीमध्ये अडकून मरण पावल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना आज सकाळी तालुक्यातील बोरगव्हाण शिवारामध्ये सकाळी आठ वाजेच्या सुमारास सालगडी शेर खा यांनी या परिसरात बिबट्या पाहिला. त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागास दिली.
दुपारी वनरक्षक एम. बी. कुंभकर्ण, पांडुरंग वाघ, शेळके हरहरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बिबट्या च्या पाऊल खुणा आढळून आल्या. पोलीस निरीक्षक बी डी सुकाळे, माजी सरपंच परमेश्वर इंगळे यांनीही पाहणी केली. दरम्यान, घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करत बिबट्या आल्याचा संशय आल्यास ग्रामस्थांनी फटाक्यांचा आवाज किंवा बँड वाजवण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत.