'आरसीबी की केकेआर'; शिवारात चालणारा आयपीएल सट्टाबाजार पोलिसांनी उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 18:50 IST2021-10-12T18:48:22+5:302021-10-12T18:50:32+5:30
IPL Betting ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त यावेळी जप्त करण्यात आला

'आरसीबी की केकेआर'; शिवारात चालणारा आयपीएल सट्टाबाजार पोलिसांनी उधळला
देवगावफाटा : तालुक्यातील आहेर बोरगाव शिवारात सुरू असलेल्या आयपीएल (IPL Betting ) क्रिकेटचा सट्टा पोलिसांनी १२ ऑक्टोबर रोजी रात्री धाड टाकून उधळून लावला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण ( Crime in Parabhani ) शाखेचे पथक आणि सेलू पोलिसांनी ही कारवाई केली.
१७ सप्टेंबरपासून आयपीएल क्रिकेट सामाने यूएईमध्ये सुरू आहेत. १० ऑक्टोबरपासून प्ले ऑफचे सामने सुरू झाल्याने या स्पर्धेत रंगत वाढली आहे. या क्रिकेट स्पर्धेने तरुणांना एकप्रकारे भुरळ टाकली आहे. सेलू शहरातील काही जण हजारो रुपयांचा सट्टा या स्पर्धेतील सामन्यांवर लावत आहेत, अशी गोपनीय माहिती स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांना मिळाली. खोले यांच्यासह कर्मचारी दीपक मुदिराज, अझहर पटेल, सय्यद जाकेर, दीपक मुंढे यांचे पथक ११ ऑक्टोबर रोजी रात्री सेलू शहरात दाखल झाले.
सेलू येथील पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, उपनिरीक्षक साईनाथ अनमोड व पंच यांना सोबत घेऊन १२ ऑक्टोबर रोजी रात्री १.१५ वाजता आहेर बोरगाव शिवारात सुरू असलेल्या आयपीएल सट्टाच्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी सुधीर नारायण शेट्टी (५५, रा.बेलाविस्टा गोखलेरोड, दक्षिण दादर वेस्टमुंबई) हा अवैधरीत्या लोकांकडून पैसे घेऊन विनापरवाना सट्टा चालवित असताना सापडला. यावेळी इतर तिघे जणं घटनास्थाळावरून पळून गेले. पोलिसांनी सुधीर शेट्टी या आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून रोख २६ हजार ३५० रुपये व ७० हजार रुपयांचे २ मोबाइल असा ९६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक साईनाथ अनमोड यांच्या फिर्यादीवरून ४ आरोपीविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड हे तपास करीत आहेत. पोलीस फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मुंबई येथील व्यक्ती सेलू तालुक्यात येऊन सट्टा घेत असल्याचा प्रकार या कारवाईने उघड झाला.