' ते' आधी फोर व सिक्स मारल्यास द्यायचे बक्षिसी, नंतर ' बॅट ' देण्याचे आमिष देऊन केले अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:02 IST2017-10-27T11:57:52+5:302017-10-27T12:02:52+5:30
क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेऊन देण्याचे अमिष दाखवून बारा वर्षीय मुलाचे अपहरण करणा-या दोन आरोपींना परभणीच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उदगीर येथून ताब्यात घेतले.

' ते' आधी फोर व सिक्स मारल्यास द्यायचे बक्षिसी, नंतर ' बॅट ' देण्याचे आमिष देऊन केले अपहरण
परभणी- क्रिकेट खेळण्यासाठी बॅट घेऊन देण्याचे अमिष दाखवून बारा वर्षीय मुलाचे अपहरण करणा-या दोन आरोपींना परभणीच्या पोलिसांनी गुरुवारी (दि.२६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास उदगीर येथून ताब्यात घेतले. अपहरण झालेल्या मुलास कुटुंबियांकडे सुखरुप सुपूर्द करण्यात आले. जिलानी खाजा सिकलकर व कलीम शहानू सिकलकर दोघे ( रा.परंडा जि.उस्मानाबाद) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील गोरक्षण परिसरात राहणारा अभिषेक अन्सीराम दावलबाजे (१२) हा २५ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यासाठी सायकल घेऊन घराबाहेर पडला; परंतु, तो परत न आल्याने नानलपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अभिषेक हा इदगाह मैदानावर त्याच्या मित्रांसमवेत दररोज क्रिकेट खेळत असे. मागील चार- पाच दिवसांपासून जिलानी व कलीम हे दोघे या ठिकाणी क्रिकेट खेळायला येत होते. फोर व सिक्स मारल्यानंतर ते या मुलांना १० ते २० रुपयांची बक्षिसेही देत होती. यातच २५ आॅक्टोबर रोजी या दोघांनी अभिषेकला बॅट देण्यासाठी इदगाह मैदानावर बोलाविले होते. ठिकाणाहून त्याचे अपहरण केले होते. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही आरोपींची स्केच तयार करुन शोध सुरू केला होता. नानलपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक द्रोणाचार्य यांनी या प्रकरणाचा तपास केला.
उदगीर येथे मिळाले आरोपी
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. या पैकी एका पथकाला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरील दोन्ही आरोपी आणि मुलगा मिळून आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, मुलास कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहे.