२४ किमीसाठी लागतोय दीड तासाचा वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:31+5:302020-12-03T04:30:31+5:30
देवगाव फाटा - सेलू- पाथरी हा राज्य रस्ता दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला. देवगाव फाटा- सेलू- ...

२४ किमीसाठी लागतोय दीड तासाचा वेळ
देवगाव फाटा - सेलू- पाथरी हा राज्य रस्ता दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यात आला. देवगाव फाटा- सेलू- पाथरी- सोनपेठ - परळी- इंजेगाव हा राष्ट्रीय महामार्ग ४३४ बी असा विस्तारित करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून या मुख्य रस्त्याची दुरूस्ती केली गेली नाही. केवळ २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सेलू आणि पाथरी येथे दौरा असल्याने रस्त्यावरील खड्ड्याची थातूरमातूर डागडुजी केली होती. त्यातच यंदा अतिवृष्टी झाल्याने देवगाव फाटा ते पाथरी रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले. परिणामी या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. दोन महिन्यापूर्वी काही सामाजिक संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर संबंधित विभागाने केवळ खचलेला रस्त्यावरील यंत्रणाच्या सहाय्याने जागावर मटरेल पसरवले. सेलू ते पाथरी अंतर २४ किमी आहे. खड्डेमय रस्त्यामुळे हे अंतर पूर्ण करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल सेलू येथे घेऊन येण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तर वाहनाची वाट लागत आहे. दरम्यान, सेलू शहर हे श्री साईबाबा यांचे गुरू श्री केशवराव महाराज यांची भूमी आहे तर साईबाबा याचे जन्मस्थळ पाथरी आहे. मात्र या रस्त्यावर खड्डे पडल्याने अधिक अंतर असलेला मानवत मार्ग पाथरी प्रवास काही खासगी वाहन धारक करत आहेत. दरम्यान, सेलू ते देवगाव फाटा रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाल्याने आता सेलू ते पाथरी रस्त्याचेही नूतनीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोशल मीडियाव्दारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
सेलू- पाथरी रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे सोशल मीडियावर रस्त्याबाबतचे फोटो आणि पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तसेच रस्त्या दुरूस्तीसाठी या माध्यमातून लोकप्रतिनिधींनाही साकडे घातले जात आहे. दरम्यान, रस्ता दुरूस्तीसाठी प्रवाशांनी सोशल मीडियावर चळवळ उभारून संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे दोन दिवसापासून या रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. मात्र संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.