जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 03:55 PM2020-10-27T15:55:30+5:302020-10-27T15:56:34+5:30

बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती.

Irregularities in 39 water conservation works; Recommendation to file charges against the culprits | जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

जिंतूर आणि सेलूतील जलसंधारणच्या ३९ कामांत अनियमितता; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस

Next
ठळक मुद्देजिंतूर, सेलू तालुक्यातील प्रकार 

- ज्ञानेश्वर रोकडे

जिंतूर (जि. परभणी) : जालना येथील मृद व जलसंधारण विभागाच्या कार्यालयामार्फत जिंतूर व सेलू तालुक्यात २०१८-१९ या वर्षात करण्यात आलेल्या ३९ कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली असून, याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस परभणी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी तथा चौकशी अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथील व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. 

जिंतूर व सेलू तालुक्यात जालना येथील  मृद व जलसंधारण अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१८-१९ या वर्षात ४३ कोटी ४१ लाख ४६ हजारांची आडगाव, असोला, इटोली, चिकलठाणा, पाचेगाव, साईनगर, मांडववाडी, रवळगाव, बोथ, चिकलठाणा, गिरगाव बु., मांडववाडी, कवडधन, नवहाती, हनवतखेडा, कोठा, सावरगाव, पिंप्री, बोरकिनी या गावांमध्ये ३९ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. सदरील कामे पूर्ण झाल्याचे अहवालही तयार झाले; परंतु यातील बहुतांश कामे कागदोपत्रीच करण्यात आली असल्याची तक्रार औरंगाबाद येथील मृद व जलसंधारण विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी परभणी येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी कच्छवा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

कच्छवा यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे. त्यानुसार जिंतूर तालुक्यातील आडगाव येथे जून २०१९ मध्ये ५ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यामध्ये अगोदरच एक कोल्हापुरी बंधारा व ९ सिमेंट बंधाऱ्यांची कामे केलेली असताना व तीन कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी जागाही उपलब्ध नसताना ९० टक्के काम पूर्ण  झाल्याचे जलसंधारण अधिकाऱ्यांनी प्रमाणित केले. येथील कामाच्या मोजमाप पुस्तिकेमध्ये खाडाखोड करण्यात आली. २ लाख २५ हजार ७११ घनमीटर काम केल्याची कागदोपत्री नोंद झाली. 

९० टक्के कामे झाल्याचा अहवाल शासनाला 
प्रत्यक्षात १० हजार घनमीटरही काम झाले नाही. असोला येथे २९ जून २०१९ रोजी मंजुरी मिळालेल्या बंधारा क्रमांक ५ व ६ चे थातूरमातूर काम केले व ७८ टक्के काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिला. याच गाव शिवारात यापूर्वी ११ सिमेंट बंधारे व ४ कोल्हापुरी बंधारे असताना दोन्ही बंधाऱ्यांचे काम केले असल्याचे सांगितले. तालुक्यात ३९ ठिकाणची कामे झाली नसताना जवळपास ती ९० टक्के झाल्याचा अहवाल शासनाला दिला आहे.
 

Web Title: Irregularities in 39 water conservation works; Recommendation to file charges against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.