मोबाइल शॉपी फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत; ८१ मोबाईलसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजन मगरुळकर | Updated: May 27, 2025 13:22 IST2025-05-27T13:22:04+5:302025-05-27T13:22:34+5:30
परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथे केली कारवाई

मोबाइल शॉपी फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत; ८१ मोबाईलसह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
परभणी : शहरातील वसमत रोडवर असलेल्या ‘एसएस मोबाइल शॉपी’मध्ये २२ मे रोजी मध्यरात्री झालेल्या मोठ्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला अटक केली. त्यांच्या ताब्यातून ८१ मोबाइल, साउंड बार आणि चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण २१.२० लाखांचा मुद्देमाल सोमवारी जप्त करण्यात आला आहे.
परभणी शहरातील मोबाइल शॉपी फोडल्याप्रकरणी गुन्हा नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या गुन्ह्याचा तपास स्थागुशाकडे सोपवून उकल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने तपास सुरू केला. यासाठी पथकाला मिळालेल्या माहितीवरुन आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी नाशिक ग्रामीण आणि इतर काही पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली. दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून या गुन्ह्यात मालेगाव येथील अकबर खान हबीब खान आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ पथक मालेगाव येथे रवाना होऊन आरोपींना सोमवारी मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. यात उमाईस अहमद शाहेद अख्तर, साकेब अंजुम निहाल अहमद, मुदसिर अहेमद मुदीर अहेमद, अकबर खान हबीब खान, खेसर खान हबीब खान पठाण (सर्व आरोपी रा.मालेगाव, जि.नाशिक) यांना अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजू मुत्येपोड, अंमलदार मधूकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, शेख रफियोद्दीन, दिपक मुदीराज, रणजित आगळे, गणेश कौटकर यांनी केली.