Inspection by squad at crowded places in Parbhani | परभणीत गर्दीच्या ठिकाणी पथकाकडून तपासणी

परभणीत गर्दीच्या ठिकाणी पथकाकडून तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून घातपात विरोधी पथकाने गर्दीच्या ठिकाणांची तपासणी सुरु केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच घातपाताच्या कारवायांना वेळीत आळा बसावा, या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने स्थापन केलेल्या घातपात विरोधी पथकाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरु करण्यात आली आहे.
गणेशोत्सव, नरात्रोत्सव या काळातही ही मोहीम राबविली होती. नवरात्र उत्सव काळात ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. ही मोहीम महोत्सवाच्या कालावधीतच मर्यादित न ठेवता ती सध्याही राबविली जात आहे. जिल्ह्यातील संवेदनशील स्थळे, धार्मिकस्थळे, गर्दीची ठिकाणे, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी सार्वजनिक ठिकाणांना भेटी देऊन तपासणी केली जात आहे. ११ आॅक्टोबर रोजी शहरातील बसस्थानक परिसरात ही तपासणी करण्यात आली. यावेळी बसस्थानकातील संपूर्ण परिसर अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने तपासण्यात आला. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक यांच्या अधिपत्याखाली घातपात विरोधी पथकातील संतोष मोहळे, प्रवीण घोंगडे, इमरान खान, अमित शिराळकर, शेख शकील, संतोष वाव्हळ, सीता वाघमारे, अमोल सिरसकर, लक्ष्मण तोटेवाड, शिवाजी काळे, प्रेमदास राठोड, महारुद्र सपकाळ आदींनी ही मोहीम राबविली.
२२५ ठिकाणी केली तपासणी
परभणी पोलीस दलातील घातपात विरोधी पथकाने आतापर्यंत परभणी शहरासह जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक, टॉकीज, मुख्य रस्ते आणि २२५ ठिकाणी तपासणी केली आहे. तपासणीनंतर परिसरातील नागरिकांना घ्यावयाची काळजी व उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही मोहिम चालूच राहणार आहे.

Web Title: Inspection by squad at crowded places in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.