सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, तूर पडली पिवळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:54+5:302021-07-30T04:18:54+5:30
जिंतूर शहर व तालुक्यात मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला. सध्या ३-४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, खरीप ...

सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव, तूर पडली पिवळी
जिंतूर शहर व तालुक्यात मागील १५ दिवसांत जोरदार पाऊस झाला. सध्या ३-४ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, खरीप हंगामातील काही पिकांचे झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. तालुक्यात कापूस, तूर, सोयाबीन ही पिके पिवळी पडली आहेत. सततच्या पडलेल्या पावसामुळे शेतीतील खुरपणी, वखरणी, फवारणी, आंतरमशागतीची कामेसुद्धा खोळंबली होती. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतीतील कामांना वेग आला आहे.
तूर पडली पिवळी
सततच्या पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन तसेच तूर हे पीक पिवळे पडले आहे. यातच सोयाबीन पिकांवर पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या पिकावर अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीला सुरुवात केली आहे. तूर पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शेतीचे आतोनात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी अनेक गावच्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.