रेशनवरुन मिळतेय निकृष्ट ज्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:38+5:302021-04-08T04:17:38+5:30
रेशनवरुन मिळणाऱ्या गव्हाचा कोटा कमी करुन त्या जागी ज्वारी देण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र लाभार्थ्यांना वितरित केली जाणारी ज्वारी ...

रेशनवरुन मिळतेय निकृष्ट ज्वारी
रेशनवरुन मिळणाऱ्या गव्हाचा कोटा कमी करुन त्या जागी ज्वारी देण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र लाभार्थ्यांना वितरित केली जाणारी ज्वारी निकृष्ट दर्जाची असून, त्यात बुरशी, कचरा, किडे व मोठ्या प्रमाणात जळमटे आहेत. ही ज्वारी जनावरांनाही खाण्यायोग्य नाही; मात्र जिल्हा प्रशासनाकडून रेशनधान्य लाभार्थ्यांना या ज्वारीचा पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात अनेक शिधापत्रिकाधारकांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावरुन प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली असून, ज्वारीचे वाटप थांबवावे, अशी मागणी केली आहे.
ज्वारीचे वितरण थांबविण्याचे आदेश
प्रहार जनशक्ती पक्षाने निकृष्ट ज्वारीचे वितरण होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या ज्वारीचे वाटप थांबवावेत, अशा सूचना देऊन तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी परभणी, पूर्णा व सोनपेठ तालुक्याच्या तहसीलदारांना पत्र काढून ज्वारीचे वितरण त्वरित थांबवून रेशन दुकानदारांकडे शिल्लक असलेली ज्वारी परत घेऊन त्यांना चांगल्या प्रतीची ज्वारी देण्याच्या सूचना दिल्या.
यानंतरही अशा प्रकारे लाभार्थ्यांना निकृष्ट ज्वारीचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तक्रार आल्यास संबंधित तहसीलदारांना जबाबदार धरले जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.