शहरातील कचरा संकलनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:28 IST2021-05-05T04:28:18+5:302021-05-05T04:28:18+5:30

परभणी शहर महापालिकेच्या वतीने १६ प्रभागांत घंटागाडीच्या फेऱ्यांद्वारे घरोघरी जात कचरा संकलन केला जातो. ओला, सुका, इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याचे वर्गीकरण ...

Increase in city waste collection | शहरातील कचरा संकलनात वाढ

शहरातील कचरा संकलनात वाढ

परभणी शहर महापालिकेच्या वतीने १६ प्रभागांत घंटागाडीच्या फेऱ्यांद्वारे घरोघरी जात कचरा संकलन केला जातो. ओला, सुका, इलेक्ट्रॉनिक्स कचऱ्याचे वर्गीकरण घंटागाडीत आधीच केले जात आहे. सध्या रुग्णवाढीचे प्रमाण जास्त आहे, त्याचा परिणामही कचरा संकलनावर झाला आहे. एरव्ही दररोज जवळपास १०० टन कचरा गोळा होतो. त्याचे प्रमाण सध्या १२४ टनपर्यंंत पोहोचले आहे. शहरात ३ मे रोजी १२४.४० टन एवढा कचरा संकलित झाला.

अशी आहेत उपलब्ध वाहने

३६ घंटागाडी, ११ ४०७ पिकअप वाहने, ६ ट्रँक्टर अशी एकूण ५३ वाहने मनपाच्या स्वच्छता विभागाकडे कचरा गोळा करण्यासाठी उपलब्ध आहेत. या वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, वजन करणे आणि त्याचे विघटन करणे आदी कामे दररोज केली जात आहेत.

७० टन ओला कचरा

शहरात सर्वांत जास्त कचरा हा ओल्या स्वरूपाचा निघत आहे. सोमवारी दररोज केल्या जाणाऱ्या वजनात ७० टन ओला कचरा असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे कोविडमुळे वापरात आलेल्या विविध वस्तूंचे वजन ८ टन आढळून आले.

नाल्यातील गाळ उपशाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी शहरात केल्या जाणाऱ्या कामांमध्ये गाळ उपसा करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. यासाठी मनपाने सुरुवात केली आहे. छोट्या-मोठ्या नाल्यांतील गाळ उपसा केला जात आहे. यामध्ये ३६ टन गाळ उपसा करण्यात आला.

मास्क, प्लास्टीकचा वापर वाढला

कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येक जण मास्क वापरत आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेणारे आणि गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास १० हजारांपेक्षा जास्त आहे. यामुळे मास्क, जेवणासाठी वापरले जाणारे प्लास्टीकचे फेकून देता येतील असे डब्बे, कंटेनर आणि अन्य साहित्याचा वापर वाढल्याने कचरा संकलन वाढले आहे. तसेच फळांची विक्री वाढली त्यामुळे हाही कचरा वाढला आहे.

Web Title: Increase in city waste collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.