- मारोती जुमडेपरभणी - शहरातील इकबाल नगर भागात लहान मुलांच्या वादातून दोन समाजातील गट आमने-सामने येत तुफान दगडफेक झाली. या घटनेत काही दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. दगडफेकीमुळे घरांच्या काचाही फोडण्यात आल्या. एक पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकीही या झटापटीत लक्ष्य झाली आहे.
या वादाची सुरुवात शनिवारी सायंकाळच्या सुमारास इकबाल नगरमधील उद्यानात लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणातून झाली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच पुन्हा दोन गटांमध्ये संघर्ष उसळला आणि दगडफेक सुरु झाली. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी शांतता राखावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.