मानवत ग्रामीण रुग्णालयास रिक्त पदांचा आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:17 IST2021-04-09T04:17:39+5:302021-04-09T04:17:39+5:30
मानवत : सध्याच्या कोरोना स्थितीत ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असताना येथील ग्रामीण रुग्णालयात विविध अधिकारी- कर्मचाऱ्यांची ...

मानवत ग्रामीण रुग्णालयास रिक्त पदांचा आजार
मानवत : सध्याच्या कोरोना स्थितीत ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे आवश्यक असताना येथील ग्रामीण रुग्णालयात विविध अधिकारी- कर्मचाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून येथे उपलब्ध करून देण्यात आलेली यंत्रसामग्री धूळखात आहे.
मानवत येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. रुग्णालयातील क्ष-किरण विभाग अनेक महिन्यांपासून संबंधित कर्मचारी नसल्याने बंद आहे. त्यामुळे रुग्णांना ४०० रुपये खर्च करून खासगी ठिकाणावरून एक्स-रे काढून आणावे लागत आहेत. रुग्णालयास दोन शवपेट्या उपलब्ध झाल्या. परंतु, चार वर्षांपासून त्या धूळखात आहेत. त्यामुळे त्या आता उपयोगात येतील की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तीन वर्षांपूर्वी रक्त संकलन केंद्रासाठी रुग्णालयात यंत्रसामग्री येऊन पडली होती. परंतु, अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली नसल्याने ती उपयोगात येऊ शकली नाही. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत पाठपुरावाही देखील करण्यात आलेला नाही. वैद्यकीय अधीक्षकांना या बाबत विचारणा केल्यास पाठपुरावा सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देवून क्ष-किरण तंत्रज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, दोन वैद्यकीय अधिकारी आदी अधिकारी- कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.
बायोमॅट्रिक मशीन नावालाच
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार बायोमॅट्रिक प्रणालीतील उपस्थितीनुसार काढण्याचे आदेश आरोग्य उपसंचालकांनी दिले आहेत. परंतु, मानवत येथे मात्र तसे काही होताना दिसून येत नाही. सरळ रजिस्टरवर सही करून कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविली जाते. विशेष म्हणजे, काही कर्मचारी महिना-महिना गायब राहत आहेत. काही जण तर ३० दिवसांच्या एकदाच स्वाक्षऱ्या करीत असल्याची चर्चा या विभागातील कर्मचाऱ्यांमधून सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवूनही कारवाई होत नसल्याचे समजते. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी का घातले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.