बॉडी बिल्डिंगसाठी टरमाइन इंजेक्शनचा अवैध वापर, परभणीत मोठ्या साठ्यासह एक जण ताब्यात
By राजन मगरुळकर | Updated: April 5, 2025 17:26 IST2025-04-05T17:25:04+5:302025-04-05T17:26:00+5:30
नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद : विशेष पथकाची कारवाई

बॉडी बिल्डिंगसाठी टरमाइन इंजेक्शनचा अवैध वापर, परभणीत मोठ्या साठ्यासह एक जण ताब्यात
परभणी : पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी कारवाई करीत एका इसमाला दुपारी कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या परिसरातील मैदानावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे बेकायदा विक्रीसाठी आणलेल्या टरमाइन इंजेक्शनच्या एकूण ३० बॉटल आढळून आल्या. दुचाकी आणि इंजेक्शनचा साठा असा साठ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नवा मोंढा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक ढेमकेवाढ व त्यांच्या अंमलदारांनी ही कारवाई केली. झटपट शरीर सुडौल करण्यासाठी जिममधील तरुण शारीरिक कसरती सोबत इतर घटक वस्तूंचाही वापर करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या विशेष पथकाने गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन शेख महबूब शेख मजीद याच्या ताब्यातून हा साठा जप्त केला. ही कारवाई नवा मोंढा हद्दीत कस्तुरबा गांधी विद्यालय मैदानावर शुक्रवारी दुपारी करण्यात आली. जिममधील तरुणांसाठी या इंजेक्शनची विक्री केली जाणार असल्याचे समजले होते. पोलिसांनी शेख मेहबूब शेख मजीद यास ताब्यात घेतले. ही कारवाई अंमलदार विजय बांगर, रुपेश कोळेकर, पुरुषोत्तम तेजनकर, शुभम करकले यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.