जिल्ह्यात वाढला वाळूचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:18 IST2021-03-05T04:18:05+5:302021-03-05T04:18:05+5:30
दुभाजक नसल्याने वाढले अपघात परभणी : येथील वसमत रस्त्यावरील खानापूर फाट्याच्या समोर रस्त्यावर दुभाजक नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत. ...

जिल्ह्यात वाढला वाळूचा अवैध उपसा
दुभाजक नसल्याने वाढले अपघात
परभणी : येथील वसमत रस्त्यावरील खानापूर फाट्याच्या समोर रस्त्यावर दुभाजक नसल्याने किरकोळ अपघात होत आहेत. या भागात सध्या नवीन वसाहती वाढल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकही वाढली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते खानापूर फाट्यापर्यंतच दुभाजक टाकलेले आहे. हे दुभाजक पुढे दत्तधामपर्यंत वाढवावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाणीविक्रीच्या व्यवसायाला सुरुवात
परभणी : जिल्ह्यात उन्हाळ्याची चाहूल लागल असून, खासगी पाण्याचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला आहे. नळ योजनेद्वारे नियमित आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने, अनेक भागांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्याचा फायदा उचलत खासगी व्यावसायिकांनी पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच अनेक भागांत नळ योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात बोअरचे पाणी आटल्यानंतर खासगी पाणी व्यावसायिकांवरच नागरिकांची भिस्त राहत आहे.
रेल्वे स्थानकावर वाढली प्रवाशांची संख्या
परभणी : शहरातील रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. नांदेड-मनमाड या मार्गावर रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. सध्या आरक्षणासह रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. बससेवेच्या तुलनेत हा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या प्रवासालाच महत्त्व दिले असून, रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे.
कालव्यावरील
पुलाची दुरवस्था
परभणी : शहरातील जिंतूर रस्त्यावरील जायकवाडी कालव्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावरील रस्ता जागोजागी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडखळत वाहने चालवावी लागत आहेत. मागील अनेक वर्षांपासूनची ही समस्या आहे. तेव्हा पुलावरील या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पीक कर्जाचे वाटप संथगतीनेच
परभणी : जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप अजूनही संथगतीनेच होत आहे. खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रबी हंगामात तरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बँक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही हे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.
जिल्ह्यात गुटख्याची विक्री सुरूच
परभणी : जिल्ह्यात गुटख्याची विक्री सर्रास सुरू झाली आहे. मध्यंतरी पोलीस प्रशासनाने गुटखा विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केल्यानंतर, या विक्रीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, आता परत खुलेआम गुटख्याची विक्री केली जात आहे. राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना, या नियमांचे कुठेही पालन होत नाही. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी याविरुद्ध मोहीम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात सुविधांचा अभाव
परभणी : परभणी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पुरेशी जागा उपलब्ध आहे. मात्र या ठिकाणी खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सुविधांचा अभाव आहे. भौतिक सुविधांची वानवाही याठिकाणी दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.