तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र दिले, मला पैसे द्या, एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 22:38 IST2025-11-04T22:36:54+5:302025-11-04T22:38:10+5:30
तक्रारदार यांची पत्नी हिचा २२ फेब्रुवारी २०२५ ला आजारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबत ग्रामपंचायत येथे नोंद करून ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याकडून तक्रारदार यांनी २३ ऑक्टोबरला मृत्यू प्रमाणपत्र घेतले.

तुम्हाला मृत्यू प्रमाणपत्र दिले, मला पैसे द्या, एक हजारांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत अधिकारी जाळ्यात
परभणी : तक्रारदाराच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तिचे मृत्यू नोंद प्रमाणपत्र ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून घेतल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी याने काही दिवसांनी लाचेची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने मंगळवारी एसीबी पथकाकडे तक्रार अर्ज दिला. त्यावरून झालेल्या पडताळणी आणि कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडून एक हजाराची मागितलेली लाच रक्कम स्वीकारली.
ही सापळा कारवाई मानवत तालुक्यातील खरबा ग्रा.पं. येथे मंगळवारी झाली. रमेश रंगनाथराव मुळे, ग्रामपंचायत अधिकारी, खरबा, ग्रा.पं. असे आरोपी लोकसेवकाचे नाव आहे.
तक्रारदार यांची पत्नी हिचा २२ फेब्रुवारी २०२५ ला आजारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबत ग्रामपंचायत येथे नोंद करून ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे यांच्याकडून तक्रारदार यांनी २३ ऑक्टोबरला मृत्यू प्रमाणपत्र घेतले. ग्रामपंचायत अधिकारी मुळे यांनी मृत्यू नोंद घेऊन प्रमाणपत्र दिल्यामुळे तक्रारदारास पाचशे रुपयांची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी पाचशे रुपये रक्कम नाईलाजास्तव दिली. पुन्हा २८ ऑक्टोबरला ग्रामपंचायत अधिकारी मुळे यांनी तक्रारदार यांना फोन करून मृत्यू प्रमाणपत्र दिले म्हणून पुन्हा पाचशे रुपयाची मागणी केली.
ही रक्कम लाच असल्याने तक्रारदार यांनी चार नोव्हेंबरला एसीबी परभणी येथे तक्रार अर्ज दिला. त्यावरून पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्यासह पथकाने ग्रामपंचायत कार्यालय खरबा येथे पंचासह पडताळणी केली. दरम्यान, लोकसेवक रमेश मुळे याने तक्रारदाराकडे एक हजाराची लाचेची मागणी पंचासमक्ष केली. लाच रक्कम स्वीकारल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पोलिस उपअधीक्षक महेश पाटणकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास पोलिस निरीक्षक मनीषा पवार करीत आहेत.