परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 12:49 AM2020-02-05T00:49:47+5:302020-02-05T00:50:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म ...

The highest ferries on the Godavari River | परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

परभणी: वाळूघाट लिलावाची प्रक्रिया सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला असून, तो मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून, साधारणत: दोन महिन्यांमध्ये वाळू घाट खुले होतील, अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे़
तब्बल दीड वर्षांपासून जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू चोरी वाढली आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे लिलावाअभावी जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, वाळू घाटांच्या लिलावाची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे़
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानंतर सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याने वाळू उपसा करणेही शक्य नव्हते़ मात्र आता काही वाळू घाटांमधून वाळू उपसा करणे शक्य झाल्याने जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयाच्या वतीने ३० वाळू घाटांचा खाणकाम आराखडा तयार केला असून, हा आराखडा मंजुरीसाठी भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे़ खनिकर्म संचालनालयाची मंजुरी मिळाल्यानंतर वाळू घाटांचे लिलाव करण्यासाठी जनसुनावणी घेणे त्यानंतर राज्य समितीच्या बैठकीत या प्रक्रियेला मंजुरी घेणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होणार आहे़ या सर्व प्रक्रियेला साधारणत: दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांना वाळू घाट खुले होण्यासाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे़ असे असले तरी प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे जिल्हावासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत़
गोदावरी नदीवरील सर्वाधिक घाट
४जिल्हा प्रशासनाने खाणकाम आराखडा तयार केलेल्या ३० घाटांमध्ये गोदावरी नदीवरील सर्वाधिक वाळू घाट आहेत़ या नदीवर १८, पूर्णा नदीवरील ७ आणि दूधना नदीवरील ५ वाळू घाटांचा समावेश आहे़
४त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील सर्वाधिक ९ वाळू घाटांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत़ त्याखालोखाल परभणी तालुक्यातील ५, गंगाखेड तालुक्यातील ४, सेलू, पालम तालुक्यातील प्रत्येकी ३, सोनपेठ, मानवत आणि जिंतूर तालुक्यातील प्रत्येकी २ वाळू घाटांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले आहेत़
जनसुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी
४वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे़ शासनाच्या नियमानुसार भूविज्ञान खनिकर्म संचालनालयाने मंजुरी दिल्यानंतर या प्रस्तावांची जन सुनावणी घेणे आवश्यक आहे़
४या सुनावणीसाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित करून दिला आहे़ त्यामुळे जनसुनावणी वाळू घाटांच्या मंजुरीसाठीच तब्बल एक महिन्याचा कालावधी लागणार आहे़ त्यानंतर जनसुनावणीत मंजूर झालेल्या वाळू घाटांना स्टेट इन्व्हार्नमेंट असेसमेंट कमिटी (एसईएसी) आणि स्टेट इन्व्हार्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अ‍ॅथॉरिटी (एसईआयएए) या दोन समित्यांच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे़
४ही मंजुरी मिळाल्यानंतर ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार असून, या प्रक्रियेनंतर मंजूर झालेल्या वाळू घाटांची रक्कम जमा करून घेण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे़ त्यामुळे किमान दोन महिने येथील नागरिकांना खुल्या वाळूसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे़
या वाळू घाटांचे प्रस्ताव सादर
जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील ३० वाळू घाटांचे खाणकाम आराखडे तयार केले आहेत़ त्यामध्ये पूर्णा तालुक्यातील गोळेगाव, धनगर टाकळी, पेनूर, कळगाव, धानोरा मोत्या, मुंबर, कानडखेड, पिंपळगाव सारंगी, पिपंळगाव बाळापूर, गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, आनंदवाडी, सोनपेठ तालुक्यातील लोहीग्राम, पोहंडूळ, परभणी तालुक्यातील काष्टगाव, जोड परळी, सावंगी खुर्द, नांदगाव खुर्द, पिंपळगाव टोंग, मानवत तालुक्यातील शेवडी जहांगीर, वांगी, सेलू तालुक्यातील खादगाव, मोरेगाव, काजळी रोहिणा, जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके, वझूर-२ आणि पालम तालुक्यातील राहटी, दुटका, धनेवाडी या वाळू घाटांचे खाणकाम आराखडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत़

Web Title: The highest ferries on the Godavari River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.