परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका
By राजन मगरुळकर | Updated: October 14, 2022 18:58 IST2022-10-14T18:58:14+5:302022-10-14T18:58:49+5:30
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना या झालेल्या चांगलाच फटका दिला आहे.

परभणी, पाथरीत दीड तास मुसळधार पाऊस, पिकांना मोठा फटका
परभणी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी चांगलीच हजेरी लावली. परभणी शहर आणि पाथरी तालुक्यात जवळपास दीड तास मुसळधार पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांना या झालेल्या चांगलाच फटका दिला आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास पाथरी शहरात पावसाला सुरूवात झाली. तब्बल दीड तास अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पाथरीत झाला. विशेष म्हणजे, पाथरी शहरातील बाजार समिती परिसर तर या पावसाच्या पाण्याने तुंबला. परिणामी, अनेक भागात पाणी रस्त्यावर आले. दरम्यान, परभणी शहरात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. शहर हद्दीत सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच सखल भागातील रस्ते सुध्दा जलमय झाले होते. दरम्यान, या परतीच्या पावसाने ग्रामीण भागात अनेक शेतशिवारात पिकांमध्ये पाणी साचले होते. तर काही ठिकाणी सोयाबीन काढणीला या पावसाने व्यत्यय आला.
येथेही झाला पाऊस
खंडाळी (ता.गंगाखेड), मुदगल, विटा, वाघाळा (ता.पाथरी), शेळगाव, सोनपेठ, पालम, दैठणा, गंगाखेड, खळी, ताडकळस, पूर्णा, झरी, ताडबोरगाव, पेडगाव.