हरभऱ्याला लागली मर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:08+5:302021-02-05T06:05:08+5:30
पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार ...

हरभऱ्याला लागली मर
पाथरी : तालुक्यातील रब्बी हंगामातील हरभरा पिकाला सध्या घाटे लागले असताना, या पिकावर मर रोगाची लागण झाल्याने ६ हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. परिणामी, उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाथरी तालुक्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या पिकाला चांगलाच फटका बसला होता. कापसाच्या उताऱ्यात जवळपास ६० टक्क्यांनी घट झाल्याचे तज्ज्ञांची म्हणणे आहे, तर सोयाबीनला समाधानकारक उतारा आला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरीपातील नुकसानीतून सावरण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांचा आधार मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, परंतु या पिकांवरही नैसर्गिक संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने, शेतकऱ्यांनी जवळपास ६ हजार हेक्टरवर हरभऱ्याचे पेरा केला आहे. हे पीक चांगले आले असताना, यावर आता बुरशी दिसून येऊ लागली आहे. या पिकाला सध्या घाटे लागले आहेत. अशातच याला मर रोगाची लागण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
तालुक्यातील मंडळनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कासापुरी- १,१५६
हदगाव - ६८३
पाथरी - २,२३५
बाभळगाव १,८६८
‘‘रब्बीमध्ये हरभरा पेरणी करताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी, आशा सूचना शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी दिल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्याचबरोबर अतिवृष्टीने बुरशीचा फटका बसला आहे. १० टक्क्यांपर्यंत मर लागल्याचे दिसत आहे.
शिंदे, कृषी अधिकारी, पाथरी
‘‘सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी केली. सध्या हरभऱ्याला घाटे लागले आहेत. या अवस्थेत हरभरा पिकाला ३० ते ४० टक्के मर लागली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल.
बाळासाहेब नावघरे, शेतकरी कासापुरी