सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे १५ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:12 IST2021-07-24T04:12:53+5:302021-07-24T04:12:53+5:30
सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला आहे. यातच कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. यामध्ये व्हाॅट्स अप, ...

सोशल मीडियावरही महिलांचा छळ, सायबरकडे १५ गुन्हे
सध्या प्रत्येकाच्या हाती मोबाइल आला आहे. यातच कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. यामध्ये व्हाॅट्स अप, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांचा वापर अनेकांकडून केला जात आहे. यात महिला, तरुणी यांचाही सक्रिय सहभाग या सर्व समाज माध्यमावर सध्या सुरू असल्याचे दिसून येते. याचाच गैरफायदा काही मनोविकृत व हँकर्स तसेच अनोळखी व्यक्ती घेत आहेत. या माध्यमातून महिला, मुलींचा मानसिक छळ केल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. यामुळे महिला व मुलींनी या सर्व माध्यमांचा वापर करताना आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे.
कुठल्या प्रकारचा होतो छळ
घाणेरडे मेसेज पाठविणे
अश्लील व्हिडिओ पाठविणे
बनावट खाते उघडून त्याचा प्रसार करणे
मुलींचे व्हाॅट्स अपवरील फोटो चोरून त्याचा गैरवापर करणे
अशी घ्यावी काळजी
मुली, महिलांनी स्वत:चा एकट्याचा फोटो प्रसारित करू नये
अनोळखी व्यक्तीला आपल्या सोशल मीडिया खात्याशी जोडू नये.
गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.
सर्व खाते वापरताना त्याचा पासवर्ड जन्म तारीख, मोबाइल नंबर ठेवू नये.
येथे करा तक्रार
देशाच्या गृह विभागाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल नावाची वेबसाईट केवळ अशा प्रकारची फसवणूक किंवा छळ झाल्यास तक्रार नोंद करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सायबर क्राईममध्ये तक्रार नोंद करता येते. तसेच जिल्ह्याच्या सायबर सेलकडे थेट गुन्हा नोंदविता येतो.
तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक
महिला तसेच मुली या प्रकाराबाबत शक्यतो बदनामी होईल या भीतीने त्रास सहन करतात. त्या पुढे येत नाहीत. यासाठी तक्रार केल्यास समोरच्या व्यक्तीला चाप बसण्यासाठी महिला, मुलींनी तत्काळ तक्रार करावी.
महिला व मुलींनी स्वत: सोशल माध्यमावर वावरताना आपल्या एकट्याचा फोटो डीपीवर स्टेटसला तसेच अन्य ठिकाणी ठेवू नये. जर कोणी त्रास देत असेल तर त्याची थेट तक्रार करावी. - संतोष शिरसेवाड, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.
सायबर सेलने घेतल्या कार्यशाळा
शहरातील महाविद्यालयीन मुली तसेच तरुणी व महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी, यासाठी ४ ते ५ ठिकाणी कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच शहरातील एटीएम, खासगी, शासकीय कार्यालये तसेच शाळा, महाविद्यालय येथे भित्तीपत्रक, बॅनर लावले आहेत. या कार्यशाळेसाठी संतोष व्यवहारे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, राजेश आगाशे, रवींद्र भूमकर, गौस पठाण, राम घुले यांनी प्रयत्न केले.
मुलीकडूनही दुसऱ्या मुलीची बदनामी
काही प्रकरणात वैयक्तिक कारणावरून जिल्ह्यात २ वेगवेगळ्या प्रकरणात २ मुलींनी दुसऱ्या मुलीची, तसेच अन्य एका प्रकरणात मुलाची बदनामी करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. जिल्ह्यात गंगाखेड, पालम, पाथरी व परभणी शहरात असे गुन्हे घडले आहेत.
वर्ष एकूण तक्रारी महिलांनी केलेल्या तक्रारी
२०१८ १० २
२०१९ १५ २
२०२० १० ७
२०२१ १५ ३
जिल्ह्यात दोन हजार अठरा ते एकवीस या चार वर्षात ५० तक्रारी दाखल झाल्या यापैकी पंधरा महिलांनी गुन्हे दाखल केले आहेत काही जणांकडून महिला व मुलींच्या फोटो तसेच गोपनीय माहितीद्वारे त्यांना त्रास दिला जाण्याचा प्रकार वाढत आहे. काही जणांकडून महिला व मुलींच्या फोटो तसेच गोपनीय माहितीद्वारे त्यांना त्रास दिला जाण्याचा प्रकार वाढत आहे.