वाढत्या शिबिरांमुळे अत्यवस्थ रुग्णांची रक्ताची गरज भागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:08 IST2021-05-04T04:08:25+5:302021-05-04T04:08:25+5:30
परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, जिल्हा रक्तपेढीत आता ४१० ...

वाढत्या शिबिरांमुळे अत्यवस्थ रुग्णांची रक्ताची गरज भागली
परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, जिल्हा रक्तपेढीत आता ४१० रक्त पिशव्या जमा झाल्याने दोन आठवड्यांपर्यंत रुग्णांची रक्ताची गरज भागली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यातील रक्तदान मोहिमा थंडावल्या होत्या. त्याचा परिणाम रक्तपेढीतील साठ्यावर झाला. मागच्या आठवड्यामध्ये जिल्हा रक्तपेढीत केवळ ६४ बॅग रक्तसाठा शिल्लक राहिला होता. विशेष म्हणजे जिल्ह्यातील रुग्णांसाठी दररोज ४० ते ५० रक्त बॅग लागतात. प्रत्यक्षात ६४ रक्त बॅग शिल्लक राहिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन सामाजिक संस्थांना केले होते. कोरोनाच्या संकटकाळातही अनेक सामाजिक संस्थांनी या कामात पुढाकार घेतला. दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्यातून जिल्हा रक्तपेढीमध्ये आता ४१० रक्त पिशव्यांचा साठा जमा झाला आहे.
एका शिबिरात १०० बॅगचे संकलन
मानवत येथे आयोजित केलेल्या शिबिरातून एकाच दिवशी १०५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. त्याचप्रमाणे परभणी शहरातही दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १०० बॅग संकलित झाल्या.