शेतकऱ्यांची हेळसांड; परभणी जिल्ह्यातील ३३४ गावे अतिवृष्टीच्या यादीतून वगळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 04:59 PM2020-10-27T16:59:46+5:302020-10-27T17:24:00+5:30

३३४ गावे राहणार शासकीय मदतीपासून वंचित

The greediness of the administration; 334 villages excluded from the list of heavy rains | शेतकऱ्यांची हेळसांड; परभणी जिल्ह्यातील ३३४ गावे अतिवृष्टीच्या यादीतून वगळली

शेतकऱ्यांची हेळसांड; परभणी जिल्ह्यातील ३३४ गावे अतिवृष्टीच्या यादीतून वगळली

Next
ठळक मुद्देवंचित शेतकऱ्यांची प्रशासनाकडे धावसरसकट मदत देण्याची मागणी

परभणी :  बहुतांश मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असताना ३३४ गावांना मात्र अतिवृष्टीच्या मदतीपासून वगळण्यात आले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात जिल्ह्यात अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. याशिवाय अतिवृष्टीनंतर ओढ्या- नाल्यांना पूर आल्याने अतिवृष्टीचे मंडळ वगळता इतर मंडळात पुराचे पाणी शिरुन पिकांचे नुकसान झाले आहे.

निम्न दुधना, येलदरी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने नद्यांना पूर आला. त्यामुळेही पिकांचे नुकसान झाले आहे. असे असताना जिल्ह्यातील ८०४ गावांपैकी केवळ ५१४ गावांमध्येच ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. त्यात ३३४ गावांना मात्र वगळण्यात आले आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार परभणी तालुक्यातील १००, सेलू  : ३३, जिंतूर : ११२, पाथरी ५६, मानवत ५३, सोनपेठ ५२, गंगाखेड ११, पालम २९ आणि पूर्णा तालुक्यातील ६८ गावांतील पिके अतिवृष्टीने बाधित झालेल्या नोंद घेतली आहे. या गावांतील पीक नुकसान भरपाईसाठी १०८ कोटी १५ लाख ८४ हजार रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. त्यामुळे इतर गावांत अतिवृष्टी झाली असतानाही मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे. 

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार 
जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झालेली असतानाही त्या गावांचा समावेश अतिवृष्टीच्या यादीत झाला नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. प्रशासनाच्या या कारभाराविरुद्ध शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात असून अतिवृष्टी झालेल्या गावांचा यादीत समावेश करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी सोमवारी परभणी, जिंतूर आणि सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाकडे केली आहे. 

अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटका
अतिवृष्टीच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सेलू तालुका शाखेनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सेलू तालुक्यातील कुपटा, वालूर, चिकलठाणा या मंडळांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र महसूल प्रशासनाने या मंडळांना सरसकट मदतीपासून वगळले आहे. तेव्हा या मंडळातील शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर मंचकराव सोळंके, गोपीनाथ सोळंके, आसाराम सोळंके, भीमराव हारके, प्रसाद सोळंके, प्रताप सोळंके, विश्वनाथ वाघमारे, पंढरीनाथ सोळंके, अंकुश सोळंके, कल्याण सोळंके, शरद सोळंके, सिद्धू सोळंके आदींची नावे आहेत.

सरसकट पंचनामे करण्याची मागणी
तालुक्यातील कुंभारी बाजार येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेव्हा पिकांची आणेवारी काढून सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानाच सलग पंधरा ते वीस दिवस पाऊस झाला. त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक वाया गेले आहे. उत्पन्न न झाल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तेव्हा सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नरसिंग ढेंबरे, ज्ञानोबा ढेंबरे, लक्ष्मण वैद्य, देविदास नवघरे, रावसाहेब नवघरे, सुरेश नवघरे, काशीनाथ जुंबडे, ज्ञानोबा नवघरे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

पिंपळगाव ठोंबरे येथील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
तालुक्यातील पिंपळगाव ठोंबरे येथील शेतकऱ्यांनीही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, अतिवृष्टी झाली असताना गावाचे नाव वगळण्यात आले आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे. अतिवृष्टी झाली असतानाही यादीतून गावाचे वगळण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तेव्हा नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी पिंपळगाव ठोंबरे येथील ग्रामस्थांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर ॲड.पद्माकर कुलकर्णी, प्रभाकर ढगे, अशोक रसाळ, भारत ढगे आदींनी केली आहे.

Web Title: The greediness of the administration; 334 villages excluded from the list of heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.