Good for the contractor; ‘GramSadak’ in the name of percentage | कंत्राटदाराचं चांगभलं; टक्केवारीच्या नादात ‘ग्रामसडक’चा बट्ट्याबोळ

कंत्राटदाराचं चांगभलं; टक्केवारीच्या नादात ‘ग्रामसडक’चा बट्ट्याबोळ

ठळक मुद्देनिकृष्ट कामांचा कळस

- ज्ञानेश्वर रोकडे

जिंतूर : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा अत्यंत सुमार राहिल्याने काही दिवसांमध्येच या रस्त्यांवर खड्डे पडत आहेत़ या कामांकडे या विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदारांचे चांगभले होत आहे़ 

जिंतूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मानधनी- झुणझुणवाडी या चार किमी, जोगवाडा-सोस-सावरगाव-कवडा या ११ किमीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांची होती़ त्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे डांबरीकरण सुरू करण्यात आले़ या कामासाठी डांबराचा योग्य वापर व कामाचा दर्जा उत्कृष्ट राखणे आवश्यक असताना संबंधित कंत्राटदार व उपअभियंता यांच्या संगनमताने जुनेच डांबर व इतर सुमार साहित्याचा वापर करण्यात आला़ रोलरद्वारे रस्त्याची व्यवस्थित दबाई केली गेली नाही़ दगडाचा कच्चा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला़ थातूरमातूर पद्धतीने केलेल्या या कामामुळे हा रस्ता खचत आहे़ 

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मानधनी-झुणझुणवाडी या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट स्वरुपाचा होता़ त्यामुळे या कामावर ग्रामस्थांकडून आक्षेप घेण्यात आला़ परिणामी हे काम थांबले आहे़ अशीच परिस्थिती जोगवाडा-सोस-सावरगाव-कवडा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची आहे़ या ११ किमीच्या रस्त्यासाठी जवळपास ५० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत़ हे कामही संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे केल्याने या कामाचे पितळ उघडे पडले आहे़ डांबरी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी चक्क काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे़ रस्त्याची योग्य प्रकारे दबाई करण्यात आलेली नाही़ दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या या रस्त्यावर खड्डे पडत असून, रस्ता दबत आहे़ या रस्त्याच्या कामाकडे या विभागाच्या अभियंत्यांनी लक्ष दिले नाही़ परिणामी संबंधित कंत्राटदाराने अंदाजपत्रकाला बगल देत मनमानी पद्धतीने काम केले़ सद्यस्थितीत या रस्त्यावरील डांबर निघून जात असून, त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात होत आहेत़ त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी जिंतूर पंचायत समितीचे उपसभापती शरद मस्के यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १७ फेब्रुवारी रोजी केली होती; परंतु, या मागणीची दखल घेण्यात आली नाही़ त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणाऱ्या कामाचा दर्जा चांगला राहील, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़ 

लॉकडाऊनमुळे कामाकडे दुर्लक्ष
या कामाच्या अनुषंगाने या विभागाचे उपअभियंता सुनील बेंगळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लॉकडाऊन असल्याने रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असल्याची कबुली देत सध्या आपण जिंतूर तालुक्यात नसल्याचे फोनवर सांगितले़ त्यामुळे अधिकाऱ्यांनीच आता या कामाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याची कबुली दिली आहे़ त्यामुळे एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक घरात असताना याच संधीचा लाभ घेऊन संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून चांगभलं करून घेतल्याचे स्पष्ट होत आहे़ 

गावात जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे़ या  रस्त्यावर सध्या जागोजागी खड्डे पडले आहेत़ या कामाची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल़
-बालाजी शिंदे-सोसकर, विभागीय अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड
 

Web Title: Good for the contractor; ‘GramSadak’ in the name of percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.